म्यानमारमध्ये बंदिस्त केलेल्या भाईंदरच्या तरुणाची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2023 08:33 AM2023-04-08T08:33:51+5:302023-04-08T08:34:17+5:30
थायलंडमध्ये नोकरीच्या नावाने फसवणूक, एजंट विरोधात होणार कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड: थायलंड येथे नोकरीसाठी पाठवून तेथून म्यानमार देशात जबरदस्तीने पाठवून म्यानमारमध्ये छळ करत कामास जुंपलेल्या भाईंदरच्या तरुणाची सुटका करून पोलिसांच्या भरोसा सेलने त्याला पुन्हा मायदेशी आणले आहे, तर परदेशात नोकरी देतो सांगून फसवणूक करणाऱ्या एजंटवर कारवाईसाठी पोलिसांनी तयारी चालवली आहे.
भाईंदरच्या उत्तन येथे राहणाऱ्या परवीन शेख यांनी भाईंदरच्या भरोसा सेलकडे तक्रार दिली होती. त्यांचा मुलगा शहजान (२५) याला ठाण्यातील एजंटने थायलंड येथे नोकरी देतो सांगून पैसे घेतले. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरला एजंटने शहजानला आधी चेन्नई विमानतळावर पाठवले. तेथून पर्यटक व्हिसाद्वारे थायलंडमध्ये नोकरीसाठी पाठवले, मात्र थायलंड येथे तो पोहोचल्यावर त्याला तेथे नोकरी न देता तेथून बेकायदेशीररीत्या लगतच्या म्यानमार देशात बळजबरीने पाठविण्यात आले. त्याचा मोबाइल काढून घेत म्यानमारमधील एका कंपनीत कॉलिंग करण्याचे काम दिले. दिलेले लक्ष्य पूर्ण केले नाही, तर त्याचा अमानुष छळ केला जात असे. २८ दिवसांनी त्याला मोबाइल अर्ध्या तासासाठी दिल्यावर त्याने आई परवीन हिला कॉल करून झालेली फसवणूक व केला जाणारा छळ आदींची माहिती दिली.
शहजान नेमका कुठे आहे याची माहिती होत नव्हती. त्याच्यासोबत कोणताही संपर्क होत नसल्यामुळे तो नक्की कुठे आहे व कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, याबाबत परवीन यांना कोणतीही माहिती नव्हती. भाईंदर भरोसा सेलच्या प्रमुख सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे व सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या निदर्शनास प्रकार आणून दिल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे, सेलचे सचिन तांबवे, आफ्रिन जुनैदी यांनी तपास सुरू केला. शिंदे यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून शहजानची म्यानमार येथून सुटका केली. ३० मार्चला तो मायदेशी सुखरूप परतला.
नोंदणीकृत एजंट असल्याची खात्री करा
परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रोटेक्टर्स ऑफ इमिग्रंटसचे कार्यालय वांद्रे येथे आहे. परदेशात नोकरीसाठी पाठविणारे एजंट हे नोंदणीकृत असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. परदेशात नोकरी देतो सांगून फसविणारे आणि पुशिंगच्या माध्यमातून अन्य देशात बेकायदा पाठवण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन भरोसा सेलच्या तेजश्री शिंदे यांनी केले आहे.