ऑगस्टमध्ये कारागृहातून सुटला अन् पुन्हा घरफोड्या केल्याने पकडला
By धीरज परब | Published: September 25, 2023 12:08 PM2023-09-25T12:08:52+5:302023-09-25T12:10:42+5:30
मीरा गावठाणमधील साक्षी सावंत यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून ६५ हजारांचे दागिने १३ सप्टेंबर रोजी चोरीला गेले होते.
मीरारोड - विरार भागात तब्बल १४ चोऱ्या केल्याने पडलेला अट्टल घरफोड्या ऑगस्टमध्ये कारागृहातून सुटून येताच त्याने काशीमीरा भागात तीन घरफोड्यां केल्याने त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
मीरा गावठाणमधील साक्षी सावंत यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून ६५ हजारांचे दागिने १३ सप्टेंबर रोजी चोरीला गेले होते. या शिवाय घरफोड्यांचे होणारे गुन्हे पाहता या प्रकरणी पोलीस उपायुक्त जयंत बजबळे व सहायक आयुक्त महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली काशीमीराचे वरिष्ठ निरीक्षक संदीप कदम , निरीक्षक समीर शेख , सहायक निरीक्षक योगेश काळे , उपनिरीक्षक शिवाजी खाडे सह रमेश इगवे , अनिल पवार , प्रताप पाचुंदेमी अक्षय पाटील , राहुल सोनकांबळे , निलेश शिंदे , स्वप्नील मोहिले , सतीश निकम , रवी कांबळे , प्रवीण टोबरे , किरण वीरकर , राजेंद्र सूर्यवंशी यांच्या पथकाने घरफोड्यांचा तपास चालवला होता.
पोलिसांनी विविध भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक संशियत दिसून आला होता . त्याची पडताळणी केली असता तो अट्टल घरफोड्या अक्रम फारुक अन्सारी ( २५ ) असल्याचे निषपन्न झाले . पोलिसांनी त्याला विरारच्या गोपचरपाडा भागातून पकडले . त्याच्या कडील चौकशीत काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत तीन घरफोड्या केल्याचे उघडकीस आले . त्याच्याकडून १ लाख ४० हजार किमतीचे सोन्याचे दागिने व कडी कोयंडा तोडण्यासाठी वापरत असलेला लोखंडी रॉड जप्त केला आहे.
नशेसाठी घरफोड्या करणारा अक्रम हा तीन वर्ष कारागृहात होता . ऑक्टोबर २०२२ मध्ये कारागृहातून सुटून आल्यावर नोव्हेम्बर २०२२ ते जानेवारी २०२३ ह्या ३ महिन्यात अक्रम याने विरार परिसरात धुमाकूळ घालत तब्बल १४ घरफोड्या केल्या होत्या . याला विरार गुन्हे शाखा ३ चे प्रमोद बडाख व पथकाने जानेवारी २०२३ मध्ये अटक केली होती . ऑगस्ट २०२३ च्या पहिल्या आठवड्यात कारागृहातून बाहेर येताच पुन्हा घरफोड्या सुरु केल्या.