परमबीर सिंग यांना दिलासा; अटक वॉरंट कोर्टाने केले रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 04:56 PM2021-11-26T16:56:24+5:302021-11-26T18:55:39+5:30
Parambir Singh : ठाणे न्यायालयाने सिंग यांना दोन अटी घातल्या असून जेव्हा तपास अधिकरी बोलावतील तेव्हा तपासला उपस्थित राहायचे आणि १५ हजाराचा वैयक्तिक जामिनावर भरावा लागणार आहे.
ठाणे: सर्वोच्च न्यायालयाकडून आधीच संरक्षण मिळविलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपी तथा मुंबईचे आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरुद्ध काढलेले अटक वॉरंट ठाण्याचे मुख्यन्यायदंडाधिकारी राजेंद्र तांबे यांनी अखेर शुक्रवारी रद्द केले. १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलका तसेच एक वैयक्तिक जामीन ३ डिसेंबरपर्यंत देण्याच्या अटीवर न्यायालयाने त्यांना हा दिलासा दिला.
ठाणेनगर पोलीस ठाण्यात क्रिकेट बुकी सोनू जालान आणि व्यावसायिक केतन तन्ना यांनी दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्हयात वारंवार समन्स बजावूनही परमबीर हे गेल्या सहा महिन्यांपासून हजर होत नव्हते. अखेर त्यांच्याविरुद्ध ठाणो न्यायालयाने विनाजामीन अटक वारंट जारी केले होते. याच पार्श्वभूमीवर परमबीर हे आपले वकील राजेंद्र मोकाशी यांच्यासह आधी ठाणेनगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. त्यापाठोपाठ ते ठाणो न्यायालयात हजर झाले. अॅड. मोकाशी यांनी सिंग यांचे अटक वारंट रद्द करण्याची मागणी न्यायालयाला केली. तेव्हा ठाणे पोलिसांना तपासात संपूर्ण सहकार्य करण्याच्या तसेच वैयक्तिक १५ हजारांचा जात मुचलका देण्याच्या आणि एक जामीन देण्याच्या अटीवर न्यायालयाने ते वॉरंट रद्द केले. यावेळी वैयक्तिक जामीन देण्यासाठी दोन आठवडयांची मुदत परमबीर सिंग यांनी अॅड. मोकाशी यांच्या मार्फतीने मागितली. मात्र, न्यायालयाने जास्त मुदत न देता ३ डिसेंबपर्यंतत ही मुदत दिली. तसेच १५ हजारांचा वैयक्तिक जातमुचलकाही अॅड. मोकाशी यांनी दिला. त्यानंतर परमबीर सिंग यांच्याविरुद्धचे अटक वॉरंट न्या. तांबे यांनी रद्द केले. वैयक्तिक जातमुचलका देतांना सिंग यांचे आधारकार्डही तपासून घेण्याचे न्यायालयाने बजावले. तेंव्हा ते तपासल्याचे आरोपींच्या वकीलाने सांगितले. या सुनावणीच्या वेळी न्यायालयात वकीलांची मोठी गर्दी झाली होती. शिवाय, न्यायालयाच्या आवारातही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
यापुढे तपासला पूर्ण सहकार्य करणार- राजेंद्र मोकाशी, परमबीर सिंग यांचे वकील
आम्ही कोर्टाला सांगितले की, आरोग्य व्यवस्थित नसल्याने आम्ही उपस्थित राहू शकलो नाही, आता यापूढे चौकशीला जेव्हा जेव्हा बोलावतील तेव्हा उपास्थित राहणार आहे. पुढे ज्या ज्या ठिकाणी आम्हाला बोलावण्यात येईल, चांदीवाल आयोग समोर देखील आम्ही जाऊ, आता देखील चौकशी सुरू आहे, असेही ते म्हणाले.