खोटी पटसंख्या दाखवत कोट्यवधी रुपयांच्या निधीवर डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 04:17 AM2021-02-02T04:17:01+5:302021-02-02T04:20:27+5:30
Thane News : योजनेचा कोड हॅक करून ज्या शाळेत अल्पसंख्याक विद्यार्थीच नाहीत, अशा शाळांमध्ये ते विद्यार्थी दाखवून कोट्यवधींची लूट काही हॅकरनी केल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे : केंद्राच्या अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून ज्या शाळांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थी असतात, त्यांना यातून वार्षिक पैसे मिळत असतात. परंतु, या योजनेचा कोड हॅक करून ज्या शाळेत अल्पसंख्याक विद्यार्थीच नाहीत, अशा शाळांमध्ये ते विद्यार्थी दाखवून कोट्यवधींची लूट काही हॅकरनी केल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला विस्तार अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. खोटी पटसंख्या दाखवून करोडो रुपये हडपण्याचा प्रकार यातून उघड झाला आहे. त्यामुळे अशा हॅकरचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून पहिली ते नववीपर्यंतच्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जात आहे. २०१७ पासून ही योजना देशभर सुरू आहे. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या आणि खासगी अनुदानित शाळेत शिक्षण घेणाऱ्या पहिली ते नववीच्या अल्पसंख्याक विद्यार्थांना लाभ मिळतो. तिच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या खात्यात किमान दहा हजार रुपये वर्षाला जमा होतात. ठाण्यातील एका खासगी शाळेच्या नावावर या योजनेच्या अंतर्गत ५८८ मुलांची खोटी पटसंख्या दाखवून तिच्या माध्यमातून निधी हडपण्याचा प्रयत्न केला गेल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, ही बाब ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी पराडकर यांच्या लक्षात आली. त्यांनी यासंदर्भात संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता, त्या शाळेने अशा प्रकारच्या योजनेकरिता काहीच अर्ज केला नसल्याचे उघड झाले. या वेळी अधिक चौकशी केली असता काही अज्ञात लोकांनी या शाळेचा क्यूआर कोड हॅक करून त्या माध्यमातून ५८८ पटसंख्या दाखवून पैसे लाटण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश
याबाबत संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधून हा सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानुसार सोमवारी केळकर यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन या गंभीर प्रकाराबाबत त्यांना माहिती दिली.