Remdesivir: रेमडेसिविरची ब्लॅक मार्केटिंग करणारा मेडिकल स्टोर्सचा संचालक जेरबंद, २ इंजेक्शन, ५० हजार जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 10:08 PM2021-05-01T22:08:25+5:302021-05-01T22:09:18+5:30
पाचपावली पोलिसांची कारवाई
नागपूर : रेमडेसिविरची ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्या एका मेडिकल स्टोर्सच्या संचालकाला पाचपावली पोलिसांनी शनिवारी रात्री रंगेहात पकडले. पाचपावलीतील मुख्य गुरुद्वाराजवळ असलेल्या अपोलो मेडिकल स्टोर्सचा संचालक २५ हजार रुपयात एक रेमडेसिविर इंजेक्शन विकत असल्याची माहिती पाचपावलीचे पोलीस उपनिरीक्षक मनीष गोडबोले यांना मिळाली. शहानिशा करण्यासाठी गोडबोले यांनी शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास एक पंटर अपोलो मेडिकल स्टोअर्स मध्ये पाठवला.
मेडिकल स्टोर्सच्या संचालकाने ५० हजार रुपयात दोन रेमडेसिविर इंजेक्शन देण्याची तयारी दाखवली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला. रात्री ९ च्या सुमारास मेडिकल स्टोरच्या संचालकाला ५० हजार रुपये घेऊन इंजेक्शन देताना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्या दुकानाची झडती घेऊन आणखी काही संशयास्पद औषधे पोलिसांनी ताब्यात घेतली. वृत्त लिहिस्तोवर पाचपावली पोलिस ठाण्यात आरोपी मेडिकल स्टोर्सच्या चालकाची चौकशी सुरू होती. वृत्त लिहिस्तोवर त्याचे नाव स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिसांचे दुसरे एक पथक त्याच्या साथीदाराला पकडण्याची धावपळ करीत होते.