Remdesivir Injection : रेमडेसिविरचा काळाबाजार करणारे गजाआड, राज्यात चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 04:21 AM2021-04-14T04:21:46+5:302021-04-14T04:22:09+5:30
Remdesivir Injection : नगरमध्ये पोलिसांनी फार्मासिस्ट प्रसाद आल्हाट व रोहित पवार यांना अटक केली आहे, तर म्हस्के हॉस्पिटलचे संचालक डॉ. कौशल्या व डॉ. किशोर म्हस्के हे दाम्पत्य फरार झाले आहे.
अहमदनगर/धुळे : राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरूच असून अहमदनगर जिल्ह्यात भिंगार शहराजवळ म्हस्के हॉस्पिटल येथे सोमवारी रात्री पोलीस व अन्न-औषध प्रशासनाने छापा टाकून दोघांना अटक केली. ७२ हजार ६०० रुपयांच्या १५ रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला आहे, तर धुळ्यात जादा दराने रेमडेसिविर विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. अन्य तिघांची चौकशी सुरू आहे.
नगरमध्ये पोलिसांनी फार्मासिस्ट प्रसाद आल्हाट व रोहित पवार यांना अटक केली आहे, तर म्हस्के हॉस्पिटलचे संचालक डॉ. कौशल्या व डॉ. किशोर म्हस्के हे दाम्पत्य फरार झाले आहे. म्हस्के हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमध्ये रेमडेसिविरची चढ्या दराने विक्री होत असल्याची माहिती भिंगार पोलिसांना मिळाली होती.
धुळ्यात एक जण गरजू रुग्णांना जादा दराने इंजेक्शन विकत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यांनी बनावट ग्राहक तयार करून त्याला दत्त मंदिर चौकात पाठवले. कृष्णा पाटील यास ताब्यात घेत, त्याच्याजवळून ३८ हजार ८९९ रुपये जप्त करण्यात आले. त्याला मदत करणारे सागर भदाणे व चितेश भामरे यांनाही अटक करण्यात आली.