रेमडेसिवीरची काळ्याबाजारात पाच ते दहा हजारांना विक्री, ठाण्यातून दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 05:20 AM2021-04-11T05:20:58+5:302021-04-11T07:11:11+5:30
Crime News : तीन हात नाका आणि बाळकूम येथे शनिवारी दोघे रेमडेसिवीरची इंजेक्शन घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार तीन हात नाका आणि बाळकूम येथे सापळा रचून दोघांना अटक केली आहे.
ठाणे : काेराेना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यभरात तुटवडा जाणवत असल्याने माेठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे खंडणीविराेधी पथकाने तीन हात नाका येथील इंटरनिटी माॅल येथे सापळा लावून एका आराेपीस रंगेहात पकडले. त्याच्याकडून १६ इंजेक्शन ताब्यात घेण्यात आली आहेत, तर बाळकूम नाका येथून आणखी एकाला पाच इंजेक्शनसह ताब्यात घेण्यात आले. आतिफ परोग अंजुम (वय २२, रा. कुर्ला, मुंबई) आणि प्रमोद ठाकूर (३१, रा. ठाकूरपाडा, भिवंडी) अशी आराेपींची नावे आहेत. ते एक इंजेक्शन ५ ते १० हजार रुपयांना विकत हाेते.
तीन हात नाका आणि बाळकूम येथे शनिवारी दोघे रेमडेसिवीरची इंजेक्शन घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार तीन हात नाका आणि बाळकूम येथे सापळा रचून दोघांना अटक केली आहे. त्या दोघांकडून पोलिसांनी २१ इंजेक्शन ताब्यात घेतल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाने दिली. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्यासह इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींविरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९९५ चे उल्लघंन, दंडनीय कलम ७ (१) (ए) कलम १८-बी व , औषध प्रसाधन कायदा १९४० चे कलम १८ (सी) अन्वये गुन्हा नोंदविल्याची माहिती देण्यात आली.ते एक इंजेक्शन ५ ते १० हजार रुपयांना विकत हाेते.