कामावरुन कमी केल्याने माजी कर्मचाऱ्यांनी घातला गोंधळ अन् अधिकाऱ्याच्या वाहनाचे केले नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 04:26 PM2021-02-09T16:26:59+5:302021-02-09T16:27:37+5:30
Crime News : या प्रकरणी सहा जाणांवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पिंपरी : कामावरुन कमी केल्याच्या रागातून सहा जणांनी देहूतील आयुध निर्माणी फॅक्ट्रीच्या गेटसमोर माजी कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला. तसेच, कंपनीतील अधिकाऱ्याच्या वाहनाने नुकसान केले. या प्रकरणी सहा जाणांवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बाजीराव टाळके, नितीन सुपारे, विक्रांत भोसले, गणेश हुंबे, तानाजी नरसळ, अशोक कदम अशी आरोपींची नावे आहेत. बाळासाहेब सखाराम भांडवलकर (वय ४७, रा. नवले ब्रिज जवळ, वडगाव बुद्रुक, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी निगडी ते देहूकडे जाणाऱ्या रस्त्यावर आयुध निर्माणी गेटसमोर फिर्यादींच्या वाहनाला मोटार सायकल आडवी लावली. त्यांना पुढे जाण्यास प्रतिंबध केला. त्यानंतर गाडीला घेराव घालून मोटारकारवर दगडफेक केली. वाहनचालका शेजारील दरवाजाचा हँडल, आरसा तोडला. तसेच फिर्यादींना गाडीतच मारायचे अशी धमकी दिली. कंपनीच्या कामगारांना आर्थिक मोबदला देऊन कामावरुन कमी केले होते. त्याचा राग आल्याने फिर्यादींचा पाठलाग करुन कारचे नुकसान केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे.