शहापुरात भाडेकरूने शेजाऱ्याला घातला ३० हजारांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 12:55 AM2019-05-09T00:55:33+5:302019-05-09T00:55:43+5:30
नवीन भाडेकरू म्हणून आलेल्या दाम्पत्याने शेजाºयाला सुमारे ३० हजारांचा गंडा घालून पोबारा केला. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहापूर - नवीन भाडेकरू म्हणून आलेल्या दाम्पत्याने शेजा-याला सुमारे ३० हजारांचा गंडा घालून पोबारा केला. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहापूर गोदाम परिसरातील संत ज्ञानेश्वर नगर येथे संतोष पानसरे यांच्या चाळीत चंद्रकांत साबळे भाडेकरू म्हणून रहातात. पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या शेजारी नवनीत नाईक आणि प्रिया नाईक हे दाम्पत्य रहावयास आले होते. आमच्या घरासाठी नवीन कुलूप घेऊन येतो, असे गोडी गुलाबीने सांगून शेजाऱ्यांकडून कुलूप घेऊन त्यांच्या दरवाजाला लावले आणि डुप्लिकेट चावी बनवून घेतली. त्यानंतर साबळे कुटुंबीय घरात नसल्याची संधी साधत नाईक दाम्पत्याने साबळेंच्या घराचे कुलूप डुप्लिकेट चावीने उघडून घरातील सोन्याची कर्णफुले, रिंगा जोड, गोलमणी, मणी मंगळसूत्र, चांदीची अंगठी तसेच एलइडी टीव्ही असा सुमारे ३० हजारांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे.
या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून शहापूर पोलीस अधिक तपास करत आहेत. पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाण्यातही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले असून याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
घरी भाडेकरू ठेवताना त्यांची कागदपत्रे तपाासून घेण्याबाबत तसेच पोलिसांना देखील याची माहिती देण्याबाबत नागरिकांमध्ये वारंवार जागृती केली जाते. तरीही भाडेकरूंकडून फसवणूक झाल्याच्या घटना घडताना दिसतात.