पुण्यातही होत होता सैराट ; बहिणीच्या पतीवर गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 04:07 PM2019-05-09T16:07:27+5:302019-05-09T16:10:04+5:30
आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून बहिणीच्या पतीवर गोळीबार करुन त्याचा काटा काढण्याचा प्रयत्न बुधवारी सायंकाळी चांदणी चौकात झाला होता़.
पुणे : आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून बहिणीच्या पतीवर गोळीबार करुन त्याचा काटा काढण्याचा प्रयत्न बुधवारी सायंकाळी चांदणी चौकात झाला होता़. मात्र, सुदैवाने तो थोडक्यात बचावला व पुण्यात सैराटची आवृत्ती होता होता बचावली़.
याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने तिघांना अटक केली आहे़.
आकाश लहू तावरे (वय २२),सागर लहू तावरे (वय २४) व सागर रामचंद्र पालवे (वय २१ रा. तिघेही राजे,ता. भोर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. या गोळीबारात तुषार प्रकाश पिसाळ (वय ३०, रा़ राजेगाव, भोर) हे जखमी झाले आहेत़.
पोलिसांच्या माहितीनुसार, तुषार पिसाळ याने आरोपी आकाश व सागर यांची बहिण विद्या हिच्याशी आंतरजातीय विवाह केला होता. या लग्नाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. यापूर्वीही त्यांच्यामध्ये वाद झाले होते. त्यातून तुषार पिसाळ याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. याच रागातून तिघांनी ८ मे रोजी चांदणी चौकातील पेट्रोल पंपासमोर मित्रासमवेत तुषार पिसाळ हे दुचाकीवरून जात होते़ त्यावेळी चौघांनी येऊन राजू तावरे याने त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या़. तिघांनी तू मरायलाच पाहिजे असे म्हणून शिवीगाळ केली होती़. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. तुषार पिसाळ यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़.
गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पोलीस हवालदार सुनिल पवार यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी हे जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यानात थांबले आहेत. त्यानुसार सापळा लावण्यात आला़. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी चारही बाजूने घेरून त्यांना अटक केली.
ही कामगिरी, गुन्हे शाखा उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, विजय झंजाड, सुनिल पवार, शंकर संपते, विशाल शिर्के, शंकर पाटील, रमेश चौधर, निलेश शिवतरे यांच्या पथकाने केली.