वारंवार पाठलाग करुन छेडछाड, रोमिओविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा
By विलास जळकोटकर | Updated: July 10, 2024 19:09 IST2024-07-10T19:09:09+5:302024-07-10T19:09:25+5:30
तरुणाविरुद्ध लैंगिक छळाच्या गुन्ह्याचेही लावले कलम

वारंवार पाठलाग करुन छेडछाड, रोमिओविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा
सोलापूर : महाविद्यालयात तोंडओळख झाल्यानंतर रोडरोमियोकडून वारंवार पाठलाग करुन शिवीगाळ करायचा. चापटा मारुन दहशत निर्माण करणाऱ्या रोमिओविरुद्ध पिडितेने विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी भा. दं. वि. कलम ३५४, ३५४ (ड) , सह लैंगिक छळाचा गुन्हा नोंदला आहे. सिद्धेश्वर बिळेनी बिरादार (रा. जुळे सोलापूर) असे गुन्हा नोंदलेल्या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील एका परिसरात पिडिता कुटुंबासमवेत राहते. पिडिता महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तोंड ओळख झाल्यानंतर नमूद आरोपीने तिच्यावर हक्क दाखवून वारंवार पाठलाग केला. अडवून दमदाटी केली. चापटा मारुन दहशत निर्माण केली. लोकलज्जेसाठी पिडितेने कोणाला सांगितले नाही.
अति झाल्याने तिने आईवडिलांना या प्रकाराबद्दल सांगितले.
आरोपीच्या वडिलांना सांगून समज देण्यात आली. त्यानंतरही त्याने पाठलाग करणे सोडले नाही. २५ जून २०२४ रोजी घराच्या भोवती दुचाकीवरुन येऊन मोठमोठ्याने हॉन वाजवून दहशत पसरवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संगीता पाटील करीत आहेत.