मुंबईच्या लोकलमध्ये माकडचाळे करणारी ही टपोरी टोळी दिसल्यास पोलिसांना कळवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 07:45 PM2018-08-01T19:45:48+5:302018-08-01T19:47:46+5:30
या व्हिडिओत दिसणारे टवाळखोर नक्की कोण आहेत? याबद्दलची कोणतीही माहिती अदयाप समोर आलेली नाही
मुंबई - मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनमधील माकडचाळे करून आपला जीव धोक्यात घालणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही हार्बर मार्गावर अशी टपोरी मुलांचे प्रकार वरचेवर होताना दिसतात.असाच एक प्रकार रविवारी पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारच्या सुमारास हार्बर मार्गवरील जीटीबी स्थानक आणि चुनाभट्टी स्थानकादरम्यानच्या प्रवासातील जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडीओ समोर आला आहे.या टपोरी मुलांना अद्दल घडविण्यासाठी पोलिसांनी जर कोणास हि मुलं दिसली तर त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन नागरिकांना केले आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसणारे टवाळखोर नक्की कोण आहेत? याबद्दलची कोणतीही माहिती अदयाप समोर आलेली नाही. या व्हिडिओत स्टंट करणाऱ्यांपैकीच एकाने सेल्फी कॅमेराने शूट केलेला दिसत असून चौघांपैकी एकजण धावत्या ट्रेनच्या छतावर चढताना दिसत आहे. तर इतर मुलं दरवाजाला आणि खिडकीला लटकल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. या हुल्लडबाजांनी प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या प्रवाशाचा मोबाइल हिसकावल्याचेही या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओमध्ये जीटीबी स्थानकात या चौघांपैकी एकजण उतरलेला दिसतो. तसेच ट्रेन सुरु झाल्यावर ती वेग पकडू लागते तसा काळ्या टी-शर्टमधील हा तरुण धावू लागतो. त्याच वेळी त्याच्या टोळीतील एकजण दरवाजाला लटकून बाहेर झेपावत प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेतो. हा संपूर्ण घटनाक्रमही या व्हिडिओत कैद झाला आहे.