बनावट टीआरपी प्रकरणी रिपब्लिक टीव्ही चौकशीच्या फेऱ्यात, दोषी आढळल्यास संबंधितांना होणार एवढी शिक्षा
By बाळकृष्ण परब | Published: October 8, 2020 06:55 PM2020-10-08T18:55:50+5:302020-10-08T19:49:56+5:30
Fake TRP News : मुंबई पोलिसांना दोन मराठी वृत्तवाहिन्या आणि रिपब्लिक टीव्हीकडून पैशांच्या मोबदल्यात बनावट टीआरपी खरेदी केला जात असल्याचा आरोप केला आहे.
मुंबई - मुंबई पोलिसांनी आज बनावट टीआरपी रॅकेट उघडकीय आणल्याने माध्यमविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांना दोन मराठी वाहिन्या आणि रिपब्लिक टीव्हीकडून पैशांच्या मोबदल्यात बनावट टीआरपी खरेदी केला जात असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, भादंवि कलम ४०९ आणि ४२० अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे आता या कलमांतर्गत दोषी आढळल्यास संबंधितांना किती शिक्षा होऊ शकते याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
खोट्या टीआरपीचा खेळ करणाऱ्या वाहिन्यांशी संबंधित व्यक्तींविरोधात भादंवि कलम ४२० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कलमांतर्गत त्यांना फसवणूक आणि अफरातफरीसाठी आरोपी बनवण्यात आले आहे. या कलमांतर्गत संबंधितांवर आरोप सिद्ध झाल्यास त्यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात येऊ शकते. तसेच या शिक्षेचा कालावधी सात वर्षांपर्यंत वाढवण्यात येऊ शकतो. दोषी आरोपींवर दंडात्मक कारवाईदेखील होऊ शकते. तसेच क्वचित प्रसंगी दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
तर कलम ४२० अंतर्गत आरोपी दोषी आढळल्यास त्याला एक वर्षाची शिक्षा होऊ शकते. ही शिक्षा दहा वर्षांपर्यत वाढवता येऊ शकते. तसेच या कलमांतर्गत गुन्ह्यासाठी दंडात्मक कारवाईचीही तरतूद आहे. हा अजामिनपात्र गुन्हा आहे. या कलमांतर्गतचे गुन्ह्यांवर प्रथमश्रेणी दंडाधिकाऱ्यांकडून सुनावणी होते. तसेच या गुन्ह्यामध्ये तडजोड होऊ शकत नाही.
संबंधित बातमी - Breaking : खोट्या TRPचा पर्दाफाश! रिपब्लिक टीव्ही चौकशीच्या फेऱ्यात, दोन मराठी चॅनेलचे मालक अटकेत
दरम्यान, चुकीच्या पद्धतीने टीआरपी मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करून खोट्या टीआरपीचे रॅकेट उघड करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. त्यासाठी बदनामी करून पैसे देऊन टीआरपीशी छेडछाड करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.रिपब्लिक टेलिव्हिजनचे प्रमोटर्स रॅकेटमध्ये सहभागी असून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करण्यात आली आहे.
बनावट टीआरपीचे रॅकेटचा भांडाफोड मुंबई पोलिसांच्या सीआययुच्या पथकाने केला आहे. घरात विशिष्ट्य चॅनेल सुरू ठेवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचं संशय असून टीआरपी रेटिंगमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी हंसा कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. टीआरपीसाठी घरांमध्ये ५०० रुपयांपासून पैसे देण्यात आले होते. फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या तीन प्रमुख चॅनेल आरोपी आहेत.रिपब्लिक टीव्हीच्या पदाधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात येणार आहे.
सहभागी असाणाऱ्या सर्वांवर अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. कितीही मोठा आरोपी असला तरी संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती सिंग यांनी दिली. बँक खाते तपासले जात आहे. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास सुरु असून यात रिपब्लिक टिव्हीनेही अशाप्रकारे पैसे घेऊन टीआरपी वाढवल्याचा संशय आहे. अन्य चॅनेलबाबतही चौकशी सुरु असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिपब्लिक टीव्हीच्या संचालकांना आणि संपादकांना मुंबई पोलिस समन्स बजावणार आहेत. आजच हे समन्स बजावले जाणार आहे. दोन चॅनलच्या मालकांना तर पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, आता रिपब्लिकचे व्यवस्थापकीय संचालक अर्णब गोस्वामी यांच्याही विरोधात पोलिस कडक कारवाई करणार असल्याची शक्यता आहे.