तब्बल १९४ कोटी गोळा करणारी संशोधन संस्था निघाली बनावट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 06:02 AM2019-03-07T06:02:19+5:302019-03-07T06:02:37+5:30
गरीबांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याच्या नावे स्थापन केलेल्या संस्थेने वैज्ञानिक संशोधनासाठी ठिकठिकाणाहून गेल्या चार वर्षांत १९४ कोटींच्या देणग्या वसूल केल्या.
- मनीषा म्हात्रे
मुंबई : गरीबांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याच्या नावे स्थापन केलेल्या संस्थेने वैज्ञानिक संशोधनासाठी ठिकठिकाणाहून गेल्या चार वर्षांत १९४ कोटींच्या देणग्या वसूल केल्या. पण ती संस्था बनावट असल्याचे प्राप्तिकर खात्याच्या चौकशीत उघड झाले असून त्या संस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधेरीतील उमेश नागदा (५५) याने चार वर्षांपूर्वी साथीदारांच्या मदतीने ‘श्री अरविंदो इन्स्टिट्यूट आॅफ अॅप्लाइड सायंटिफिक रिसर्च ट्रस्ट’ स्थापन केला. अंधेरीत त्याचे कार्यालय आहे, असे सांगून, शैक्षणिक संस्था व लोकांकडून त्यांनी देणग्या गोळा करणे सुरू केले. करसवलत मिळावी, म्हणून संस्थेने गेल्या वर्षी प्राप्तिकर विभागाकडे अर्ज केला. त्यावर प्राप्तिकर विभागाला संशय आल्याने उपायुक्त विजयकुमार मांगला यांनी तपास सुरू केला. केंद्राच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक संशोधन विभागाशीही पत्रव्यवहार केला. तेव्हा या ट्रस्टचे प्रमाणपत्र खोटे असल्याचे कळवले. ही संस्था बनावट असल्याचे आणि त्यांनी गोळा केलेल्या रकमेवरील ५८ कोटी ५९ लाखांचा कर थकवल्याचेही आढळून आले.
>आर्थिक गुन्हे शाखेमार्फत तपास
ही फसवणूक उघड झाल्याने प्राप्तिकर उपायुक्तांनी संस्थेविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी दिली.