घाटकोपरमध्ये रेस्टॉरंटला आग; एकाचा मृत्यू, दाेन जखमी, चार पोलिस घुसमटले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 09:08 AM2022-12-18T09:08:24+5:302022-12-18T09:08:41+5:30
शेजारच्या रुग्णालयालाही झळ; २२ रुग्णांना राजावाडीला हलवले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : करी रोडच्या वन अविघ्न पार्क टॉवरमधील फ्लॅटला आग लागल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारी घाटकोपरच्या एका पिझ्झा रेस्टॉरंटला भयावह आग लागली. त्यात एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाले. धुरामुळे चार पोलिस घुसमटले. आगीची झळ शेजारच्याच पारेख रुग्णालयाला बसली असून येथील २२ रुग्णांना तत्काळ राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आले.
घाटकोपर पूर्वेतील पंतनगर येथे ‘विश्वास’ ही सहा मजली इमारत असून तिच्या तळमजल्यावर जुनोस पिझ्झा रेस्टॉरंट आहे. दुपारी दोनच्या सुमारास इलेक्ट्रिक मीटर रूममध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात रेस्टॉरंट जळून खाक झाले.
धुराचे प्रचंड लोट उठत असल्याने तत्काळ इमारत रिकामी करण्यात आली. धुरामुळे परिसरातील काही जण गुदमरले. त्यांना तत्काळ राजावाडी आणि परळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत पोलिसांनी बचावकार्य हाती घेतले व तेथील लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. ते करताना चार पोलिसही गुदमरले.
त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अर्ध्या तासानंतर विक्रोळी आणि चेंबूर येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या. अग्निशमन विभागाच्या दहा गाड्यांच्या साहाय्याने तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आग विझवल्यानंतरही धूर मात्र
कायम होता.
मृत व्यक्ती :
कुरेशी देढिया (४६)
जखमी :
तुकाराम घाग (४०)
शेर बहादूर परिहार (४६)
तानिया कांबळे (१८)
कुलसुम शेख (२०)
सना खान (३०)
के. पी सुनार (४२)
जखमी पोलिस
जय यादव (५१)
संजय तडवी (४०)
नितीन विसावकर (३५)
प्रभू स्वामी (३८)
रुग्णांची घुसमट, डॉक्टरांची धावपळ...
घाटकोपर रेल्वेस्थानक परिसरातील खोकानी लेन येथे पारेख हे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आहे. आगीची झळ रुग्णालयाला बसून धूर पसरल्याने रुग्णांची धुसमट होऊ लागली. हॉस्पिटल प्रशासनाने ऑपरेशन थिएटरमधील रुग्णासह २२ रुग्णांना अन्यत्र हलवले.
सनराईज हॉस्पिटल दुर्घटनेची आठवण
२७ एप्रिल २०२१ साली भांडुपच्या ड्रीम्स मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला आग लागली होती. या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. ११ तासांनी ती आग आटोक्यात आणण्यात आली होती. त्या घटनेची आठवण यावेळी अनेकांना आली.