कायद्याच्या परीक्षेला न बसताही पास झाले निवृत्त सहायक पोलीस आयुक्त; प्रकरणाचे गूढ वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 03:56 AM2020-10-15T03:56:57+5:302020-10-15T03:57:14+5:30
सेंट विल्फ्रेड कॉलेजमधील प्रकार, बाबाजी भोर हे विद्यार्थी मुंबई येथे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) होते. या प्रकरणी मुंबई विद्यापीठाने या प्रकरणात लक्ष घालून चौकशी समिती नेमण्याची मागणी केली जात आहे.
मयूर तांबडे
नवीन पनवेल : येथील शेडुंगजवळील सेंट विल्फ्रेड विधी महाविद्यालयामध्ये २०१२पासून एलएलबीचे शिक्षण दिले जाते. कायद्याच्या परीक्षेला बसलेले नसतानाही दोन्ही परीक्षेतील आठ पेपरमध्ये पास करण्यात आलेला विद्यार्थी निवृत्त सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) निघाले आहेत. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला कायद्याच्या परीक्षेत पास करण्यात आल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
परीक्षेला बसलेले नसतानाही एलएलबी सेमिस्टर ३ एटीकेटी आणि एलएलबी सेमिस्टर ४ या दोन्ही परीक्षांच्या आठ पेपरला पास केल्याप्रकरणी सेंट विल्फ्रेड विधी महाविद्यालयातील दोघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मे २०१९ रोजी दिलेल्या अर्जानुसार तब्बल सोळा महिन्यांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाल्याने तक्रारदार सागर कांबळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
बाबाजी भोर हे विद्यार्थी मुंबई येथे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) होते. या प्रकरणी मुंबई विद्यापीठाने या प्रकरणात लक्ष घालून चौकशी समिती नेमण्याची मागणी केली जात आहे. बाबाजी भोर यांनी २०१६-१७ मध्ये या सेंट विल्फ्रेड विधी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता. भोर हे नियमित महाविद्यालयामध्ये येत नव्हते. नियमाप्रमाणे परीक्षेला बसण्यासाठी ७० टक्के हजेरी आवश्यक असते. या परीक्षेला न बसताही बाबाजी भोर यांना हजेरीपटात खाडाखोड करून पास करण्यात आले.