तुर्की लष्करातील निवृत्त कमांडोकडून गोव्यात ७१ लाखांचे ड्रग्स जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 09:27 PM2020-02-07T21:27:20+5:302020-02-07T21:29:57+5:30
या प्रकरणी अमली पदार्थविरोधी विभागाच्या अधिकाऱ्यांना सुगावा लागताच हरमल येथे सापळा रचण्यात आला.
पणजी - तुर्की लष्करातील निवृत्त कमांडो मुरत तास (४७) याला अमली पदार्थविरोधी विभागाच्या पोलिसांनी गोव्यात हरमल येथे ड्रग्स प्रकरणी अटक केली. त्याच्याकडे तब्बल ७१ लाख रुपये किंमतीचे ७१० ग्रॅम एमडीएमए ड्रग्स सापडले. विदेशी पर्यटकांना ड्रग्स विकून तो गोव्यात पार्ट्या झोडत होता.
या प्रकरणी अमली पदार्थविरोधी विभागाच्या अधिकाऱ्यांना सुगावा लागताच हरमल येथे सापळा रचण्यात आला. खालचावाडा, हरमल येथे तो भाड्याच्या घरात रहात होता, अशी माहिती पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिली. या खोलीतच त्याने हे ड्रग्स दडवून ठेवले होते. तो २०१८ साली सप्टेंबरमध्ये गोव्यात आला होता त्यानंतर मायदेशी जाऊन पुन्हा गेल्या नोव्हेंबरमध्ये आला. तुर्की लष्करात दोन वर्षे सक्तीचे कमांडो प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय ड्रग्स व्यवहार सुरु केले. भारतात तो दुसऱ्यांदा आला होता. गोव्यात त्याची जीवनशैली अत्यंत महागडी होता. पार्ट्या झोडण्यासाठी तसेच ऐषोआरामात जगण्यासाठी त्याने अमली पदार्थ व्यवहारात झोकून दिले होते.