निवृत्त कमांडोंना प्रशिक्षक बनण्याची संधी; गुप्त वार्ता विभागात नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 09:36 PM2019-09-05T21:36:10+5:302019-09-05T21:46:21+5:30
इच्छुकांना आवाहन करण्यात आले आहे
मुंबई - राज्य गुप्त वार्ता विभागाच्या (एसआयडी) कमांडो पथकातून सेवा बजावून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळणार आहे. एक वर्षासाठी त्यांना प्रशिक्षक म्हणून कंत्राटी पद्धतीने काम करता येणार आहे. एसआयडीने इच्छुक पात्र अधिकाऱ्यांना सहभाग होण्यासाठी आवाहन केले आहे.
२६/११ च्या हल्यानंतर पोलिसांच्या सक्षमीकरणातर्गंत एसआयडीच्या कार्यकक्षा व पद्धतीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये अतिरेक्यांना प्रतिबंध करण्यासाठी अद्यावत प्रशिक्षित कमांडोचा कक्षही कार्यान्वित करण्यात आला. याठिकाणी कनिष्ठ कमांडो अधिकारी (जेसीओ) किंवा एनसीओ म्हणून सेवा निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना या विभागात पुन्हा संधी देण्याचा निर्णय गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्तांनी घेतला आहे. त्यांचा अनुभव व कौशल्याचा उपयोग नवीन अधिकाऱ्यांना घेता यावा, यासाठी तीन प्रशिक्षक पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असलेला आणि ६० वर्षाहून अधिक वय नसलेल्यांची नियुक्ती केली जाणार आहे. सुरवातीला त्यांना एक वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती दिली जाईल, त्यानंतर ते सक्षम असल्याची खात्री पटल्यास त्यांना ६५ वर्षापर्यंत नियुक्ती देण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. कमांडो प्रशिक्षक म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी सात दिवसाच्या आत विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.