चोरट्यांनी सेवानिवृत्त पोलीस महासंचालकांचाच फ्लॅट फोडला; उंड्रीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 09:26 PM2020-08-25T21:26:17+5:302020-08-25T21:26:47+5:30
उंड्री येथील एका सोसायटीत एकाचवेळी दोन फ्लॅट फोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस..
पुणे : शहरात घरफोडीचे सत्र दिवसेंदिवस वाढत असून उच्चभ्रु सोसायट्यांमध्येही बंद फ्लॅट फोडण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. उंड्री येथील एका सोसायटीत एकाचवेळी दोन फ्लॅट फोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निवृत्त पोलीस महासंचालक राज खिलनानी आणि नैला रिझवी यांचे बंद फ्लॅट फोडण्यात आले.
याप्रकरणी न्याती विंडसर सोसायटीचे अध्यक्ष श्याम खंते (वय ६७) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. राज खिलनानी हे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक आहेत. ते लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख होते. ते बाहेरगावी गेले असताना २३ ते २४ ऑगस्ट दरम्यान तीन चोरटे सोसायटीत शिरले. त्यांनी खिलनानी आणि रिझवी यांचे बंद फ्लॅटचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटाचे दरवाजे उचकटून चोरी केली.
राज खिलनानी हे मार्चमध्ये हैदराबाद येथे मुलीकडे गेले होते. त्यानंतर लॉकडाऊन सुरु झाल्याने गेले काही महिने ते तेथेच राहत होते. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले की, नैला रिझवी यांच्याशी संपर्क झाला असून त्यांच्या फ्लॅटमध्ये कोणत्याही महत्वाचा ऐवज नव्हता. घरफोडीची माहिती मिळाल्यावर खिलनानी हे आज रात्री पुण्यात आले असून घरातील काय चिजवस्तू चोरीला गेल्या आहेत, हे पाहणी केल्यावर समजू शकेल़ सोसायटीतील एका सीसीटीव्हीमध्ये दूरवरुन तिघे चोरटे मध्यरात्री २ वाजता आत येताना व साधारण साडेतीन वाजता परत जाताना दिसून येत आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
लॉकडाऊनच्या काळात शहरातील सर्व गुन्हे जवळपास थांबले होते. अनलॉक सुरु झाल्यानंतर चोरी, घरफोड्यांच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे़ जुलै २०२० अखेर शहरात १५९ घरफोडी चोºयांची नोंद करण्यात आली होती़ २४ ऑगस्ट २०२० अखेर १८५ घरफोड्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट २०१९ अखेर शहरात ३३१ घरफोड्यांच्या घटना घडल्या होत्या.