निवृत्त मुख्याध्यापक, पॅथोलॉजिस्टचे घर फोडले; लाखो रुपयांचा मुद्देमाल लांबविला
By विलास गावंडे | Published: May 12, 2024 11:20 PM2024-05-12T23:20:35+5:302024-05-12T23:23:57+5:30
यवतमाळ येथून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. परंतु चोरट्यांचा माग लागू शकला नाही.
नेर (यवतमाळ) : चोरट्यांनी रविवारी नेर शहरात धुमाकुळ घातला. चार ठिकाणी चोऱ्या करून लाखो रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. सेवानिवृत्त मुख्याध्यापक, पॅथोलॉजिस्ट यांच्यासह इतर दोन ठिकाणी घरफोडी झाली. यवतमाळ येथून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. परंतु चोरट्यांचा माग लागू शकला नाही.
येथील मातोश्री नगरातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सरदार हे सकाळी ६ वाजता सहकुटुंब लग्नाला गेले होते. सायंकाळी घरी परत आले तेव्हा त्यांना दाराचे कुलूप फोडले असल्याचे दिसून आले. घरातील कपाटात ठेवून असलेले साहित्य बाहेर पडून होते. कपाटात ठेवून असलेले रोख ५६ हजार रुपये व इतर साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
दुसरी चोरी येथील बहीरम नगरात पॅथोलॉजिस्टच्या घरी झाली. डॉ.अजय राठोड व त्यांच्या पत्नी हे दोघेही लॅबवर गेले होते. घरी आले तेव्हा त्यांना घराचे कुलूप तोडले असल्याचे लक्षात आले. घरातील कपाट फोडल्याचे दिसले. चोरट्यांनी कपाटातून २४ ग्रॅम वजनाची एक लाख ५० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, रोख ५० हजार रुपये लंपास केले.
शारदानगर परिसरातही दोन चोऱ्या झाल्या. ठाकरे व जाधव यांच्या घरी चोरी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. परंतु, काहीच हाती लागले नाही. भरदिवसा झालेल्या या चोऱ्यामुळे नागरिकात भीती निर्माण झाली आहे. या चोऱ्यांचा तपास लावण्याचे आव्हान नेर पोलिसांपुढे निर्माण झाले आहे. ठाणेदार बाळासाहेब नाईक तपास करीत आहे.