निवृत्त ‘IAS’ प्रविण परदेशींचं ‘फेसबुक’ हॅक; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ‘पीए’ला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 23:40 IST2025-01-10T23:40:12+5:302025-01-10T23:40:43+5:30

सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक, फर्निचर विक्रीच्या नावाखाली दिशाभूल

Retired IAS Pravin Pardeshi Facebook hacked; Fraud with Deputy Chief Minister Ajit Pawar PA hacked | निवृत्त ‘IAS’ प्रविण परदेशींचं ‘फेसबुक’ हॅक; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ‘पीए’ला गंडा

निवृत्त ‘IAS’ प्रविण परदेशींचं ‘फेसबुक’ हॅक; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ‘पीए’ला गंडा

योगेश पांडे

नागपूर - सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे वेगवेगळे फंडे वापरून नागरिकांना जाळ्यात ओढण्यात येत असून, काही कालावधीपासून त्यांनी ‘आयएएस’, ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांनादेखील ‘टार्गेट’ करण्यास सुरुवात केली आहे. निवृत्त ‘आयएएस’ अधिकारी प्रवीण परदेशी यांचे फेसबुक खाते ‘हॅक’ करून सायबर गुन्हेगारांनी जुने फर्निचर विक्रीच्या नावाखाली जाळे टाकले. आश्चर्याची बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक त्यात अडकले व खिशातील ७५ हजार रुपये गमावले. शंका आल्याने वेळीच परदेशी यांना फोन केल्याने आणखी मोठी फसवणूक होण्यापासून वाचली. या प्रकरणात नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनायक कुलकर्णी (४५, वांद्रे, मुंबई) असे तक्रारदाराचे नाव आहे. हिवाळी अधिवेशनानिमित्ताने ते डिसेंबर महिन्यात नागपूरला होते. २२ डिसेंबर रोजी ते त्यांचे सहकारी व आयटी इंजिनिअर आलम खान यांच्यासोबत जेवण करत होते. त्यावेळी आलम खान यांच्या फेसबुक मॅसेंजरवर प्रवीण परदेशी यांच्याकडून मॅसेज आला. त्यात फर्निचरचे फोटो होते. सीआरपीएफच्या एका असिस्टंट कमांडंटची बदली झाल्याने त्याला सोफा, कपाट, एसी, सायकल, इन्व्हर्टर, डायनिंग टेबल, बेड, फ्रीज, टीव्ही, इत्यादी वस्तू केवळ १.०५ लाख रुपयांत विकायच्या असल्याचे त्यात नमूद होते. जर वस्तू विकत घ्यायच्या असतील, तर सांगावे असेदेखील मॅसेजमध्ये होते.

आलम खान यांनी व्हॉट्सॲपवर आलेला तपशील कुलकर्णी यांना पाठविला. स्वस्तात इतक्या वस्तू मिळत असल्याने कुलकर्णी यांनी त्या घेण्याची तयारी दाखविली. त्यानुसार आलम खान यांनी प्रवीण परदेशी यांच्या फेसबुक मॅसेंजरवर तसा मॅसेज दिला. काही कालावधीने कुलकर्णी यांना ७७४२३९५३८० या क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने तो सीआरपीएफमधील असिस्टंट कमांडन्ट संतोष कुमार बोलत असल्याचे सांगितले. माझे सर्व सामान भिवंडी गोडावूनमध्ये असून, तुम्ही एक लाखातच सर्व सामान घेऊ शकता, असे त्याने सांगितले. त्याच्या सांगण्यावरून कुलकर्णी यांनी त्याला यूपीआयवर ५० हजार रुपये पाठविले. त्यानंतर त्याने परत २५ हजारांची मागणी केली. अधिवेशनात व्यस्त असल्याने कुलकर्णी यांनी मुंबईत आल्यावर पैसे देतो, असे म्हटले. मात्र पॅकिंगसाठी पैसे लागतील, असे कारण दिल्याने कुलकर्णी यांनी त्याला आणखी २५ हजार रुपये पाठविले.

दोन दिवसांनी पुण्यातील नवीन घरी डिलिव्हरी करण्यास त्यांनी संतोष कुमारला सांगितले. मात्र, २४ डिसेंबरपासून त्याचा फोनच स्वीच ऑफ आला. शंका आल्याने कुलकर्णी यांनी आलम खान यांना थेट प्रवीण परदेशी यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यावेळी परदेशी यांचे फेसबुक खाते हॅक झाले असून, अज्ञात आरोपी त्यावरून फर्निचर विक्रीचे मॅसेज पाठवत असल्याची बाब समोर आली. कुलकर्णी यांनी अगोदर नॅशनल सायबर पोर्टलवर तक्रार केली. त्यानंतर सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पॅकिंगचे पाठविले होते फोटो
कुलकर्णी यांना आरोपीने सीआरपीएफचा जवान गाडीतून पुण्याच्या घरी सामान घेऊन येईल, अशी बतावणी केली होती. शिवाय पैसे दिल्यावर त्याने त्यांना पॅकिंगचे फोटोदेखील पाठविले होते. प्रवीण परदेशी यांच्या फेसबुकवरून आलेला मॅसेज व सीआरपीएफचे घेतलेले नाव यामुळे कुलकर्णी यांना शंका आली नाही. याबाबत प्रवीण परदेशी यांना संपर्क केला असता, त्यांनीदेखील फेसबुक खाते हॅक झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला. त्यांनीदेखील त्याबाबत पोलिस तक्रार केली आहे.

Web Title: Retired IAS Pravin Pardeshi Facebook hacked; Fraud with Deputy Chief Minister Ajit Pawar PA hacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.