धक्कादायक! पतीकडून पत्नीची हत्या; शरीराचे तुकडे करून प्रेशर कुकरमध्ये शिजवले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 11:33 IST2025-01-23T11:33:18+5:302025-01-23T11:33:41+5:30
एका माजी सैनिकाने आपल्या ३५ वर्षीय पत्नीची क्रूरपणे हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

धक्कादायक! पतीकडून पत्नीची हत्या; शरीराचे तुकडे करून प्रेशर कुकरमध्ये शिजवले अन्...
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातून एक भयानक हत्येची घटना समोर आली आहे. एका माजी सैनिकाने आपल्या ३५ वर्षीय पत्नीची क्रूरपणे हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या पत्नीची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले आणि त्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे तलावात फेकून दिले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, गेल्या शनिवारी (दि.१८) गुरु मूर्ती नावाच्या व्यक्तीने रचकोंडा पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मीरपेट पोलीस ठाण्यात आपली पत्नी वेंकट माधवी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस अधिकाऱ्यांनी गुरु मूर्तीची चौकशी केली. त्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि अनेक धक्कादायक खुलासे केले.
आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने आपल्या पत्नीची हत्या केली. त्यानंतरमृतदेहाचे तुकडे केले आणि प्रेशर कुकरमध्ये शिजवले. त्यानंतर ते मृतदेहाचे तुकडे जिलेलगुडा येथील एका तलावात फेकून दिले. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला आणि पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. तसेच, पोलिसांनी तलावात पीडितेच्या मृतदेहाच्या तुकड्यांचा शोध घेण्याचे काम सुरू केले.
१३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गुरु मूर्ती हा सैन्यात काम करत होता. निवृत्तीनंतर तो डीआरडीओमध्ये आउटसोर्सिंगवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. गुरु मूर्ती याने १३ वर्षांपूर्वी माधवी यांच्याशी लग्न केले होते आणि त्यांना दोन मुले आहेत. कोणालाही संशय येऊ नये म्हणून आरोपी आपल्या आई-वडिलांसह पोलीस ठाण्यात आला होता. तसेच, या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच संपूर्ण माहिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.