निवृत्त जवानाने चोरलेल्या एके-४७ रायफली अतिरेकी, नेत्यांना विकल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 01:09 AM2018-09-08T01:09:01+5:302018-09-08T01:19:29+5:30
सेवानिवृत्त जवानाने चोरलेल्या एके-४७ रायफली कुख्यात गुन्हेगार, अतिरेकी आणि नेत्यांना विकल्याचे तपासात समोर आले आहे.
- संजय परोहा
जबलपूर : देशातील सगळ््यात मोठ्या सेंट्रल आॅर्डिनन्स डेपोतून (सीओडी) एके-४७ आणि इतर शस्त्रांची चोरी आणि तस्करीचा प्रकार उघड झाल्यानंतर धक्कादायक खुलासे होत आहेत. सेवानिवृत्त जवानाने चोरलेल्या एके-४७ रायफली कुख्यात गुन्हेगार, अतिरेकी आणि नेत्यांना विकल्याचे तपासात समोर आले आहे.
जबलपूरचे पोलीस अधीक्षक अमित सिंह यांनी सांगितले, सीओडीत पाच वर्षांपासून शस्त्रास्त्रांची चोरी आणि सुटे भाग गायब केले जात होते. सेवानिवृत्त जवान पुरुषोत्तम लाल रजक हा या विक्रीचा सूत्रधार आहे.
मध्यप्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशात चोरलेल्या आणि दुरुस्ती केलेल्या जवळपास ७० एके-४७ रायफल विकल्या. ही टोळी २०१२ पासून हा प्रकार करायची. टोळीने प्रत्येक एके-४७ चे ४.५ ते ५ लाख रूपये वसूल केले.
कसा झाला पर्दाफाश?
बिहारच्या जमालपूर पोलीस ठाण्यात २९ आॅगस्ट रोजी मोहम्मद इम्रान याला तीन एके -४७ रायफल, ३० एके- ४७ मॅगझीन, ७ फिटल, ७ स्प्रिंग, ७ बॉडी कव्हर, ७ रिक्वायल स्प्रिंग, ७ ब्रिज ब्लॉकसह अटक करण्यात आली. इम्रानने चौकशीत सांगितले, ही एके- ४७ रायफल पुरुषोत्तमलालकडून मिळाली आहे. या माहितीच्या आधारे तपास केला असता गुन्ह्याची उकल झाली.