पत्रकाराच्या हत्येनंतर ३४ दिवसांनी खुलासा; सुपारी देणारा निघाला मंदिराचा पुजारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 16:32 IST2025-04-10T16:32:05+5:302025-04-10T16:32:39+5:30
पत्रकाराच्या हत्येनंतर पोलिसांनी ४ हजार पेक्षा अधिक नंबरची तपासणी केली. त्यातील संशयित १०० पेक्षा अधिक नंबरच्या व्यक्तींना चौकशीला बोलावले होते.

पत्रकाराच्या हत्येनंतर ३४ दिवसांनी खुलासा; सुपारी देणारा निघाला मंदिराचा पुजारी
उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील पत्रकार राघवेंद्र बाजपेई हत्याकांडावर सीतापूर पोलिसांनी ३४ दिवसांनी खळबळनजक खुलासा केला आहे. ८ मार्च रोजी पत्रकार राघवेंद्र बाजपेई यांची लखनौ दिल्ली नॅशनल हायवेवर दिवसाढवळ्या गोळी मारून हत्या केली होती. पत्रकार मर्डर मिस्ट्री सोडवण्यासाठी १२ पथके नेमली होती. आता पोलीस अधीक्षक चक्रेश मिश्र यांनी या हत्याकांडावर पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.
पोलीस अधीक्षक म्हणाले की, पत्रकाराच्या हत्येची सुपारी देणारा मंदिरातील पुजारी आहे. जो वेष बदलून महोली कोतवाली परिसरातील कारेदेव मंदिरात राहत होता. ज्याचं नाव शिवानंद उर्फ विकास राठोड असून तो रामकोट भागात राहायचा. पुजाऱ्याचे अल्पवयीन युवकासोबत संबंध होते. हे अनैसर्गिक कृत्य पत्रकाराने पाहिले होते. हा प्रकार लोकांसमोर उघडकीस येईल या कारणाने पुजाऱ्याने ४ लाखांची सुपारी देत शूटरकडून पत्रकाराची हत्या करुन घेतली.
आता पोलीस त्या शूटरचा शोध घेत आहेत जे अद्याप फरार आहेत. तपासात पोलिसांना त्यांचे नाव, पत्ते मिळाले आहेत. फरार आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून ते सीतापूर भागातच राहायला आहेत. पोलिसांनी आरोपी पुजाऱ्याकडून १७ हजार रोकड आणि ३ फोन जप्त केलेत. या घटनेमागील विविध १५ अँगलचा तपास पोलीस करत आहेत. पत्रकाराच्या हत्येनंतर पोलिसांनी ४ हजार पेक्षा अधिक नंबरची तपासणी केली. त्यातील संशयित १०० पेक्षा अधिक नंबरच्या व्यक्तींना चौकशीला बोलावले होते.
दरम्यान, घटनेच्या दिवशी दुपारी ३ वाजता राघवेंद्र यांना एक फोन कॉल आला होता. त्यानंतर ते बाईकवरून जिल्हा मुख्यालयाच्या दिशेने जात होते. रस्त्यात सुल्तानपूर परिसरात उड्डाणपूलाच्या इथे काही अज्ञातांनी त्यांना थांबवून गोळीबार केला. गंभीररित्या जखमी पत्रकाराला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर लवकरात लवकर आरोपींना पकडण्यासाठी पत्रकारांनी पोलिसांवर दबाव आणला होता.