अपमानाचा घेतला बदला, कशेळीतील कोकाटे खून प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 09:33 AM2023-01-04T09:33:31+5:302023-01-04T09:34:13+5:30
गणेशने आठ वर्षांपूर्वी मारहाण करून दिलेल्या अपमानास्पद वागणुकीतून त्याचा खून केल्याची कबुली धनराजने पोलिसांना दिली.
ठाणे : कशेळीतील माथाडी कामगारांचा ठेकेदार गणेश कोकाटेचा खून करणाऱ्या धनराज तोडणकर (३३, रा. इंदिरानगर, ठाणे) आणि त्याचा साथीदार संदीपकुमार कनोजिया (२७, रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी दिली. गणेशने आठ वर्षांपूर्वी मारहाण करून दिलेल्या अपमानास्पद वागणुकीतून त्याचा खून केल्याची कबुली धनराजने पोलिसांना दिली.
भिवंडीतील कशेळी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ कोकाटे याच्यावर मोटारसायकलीवरून आलेल्या दोघांनी गोळी झाडून हत्या केल्याची घटना ८ डिसेंबर २०२२ रोजी घडली होती. नारपोली पोलिस ठाण्यात हत्यार कायद्यासह खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिस आयुक्त जयजित सिंह आणि सहपोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश ठाणे पोलिसांना दिले होते.
ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पाच पथकांसह नारपोली पोलिसांकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू होता. कोकाटे याच्यावर गणेश इंदुलकर याने माथाडींच्या ठेक्यातील वादातून सप्टेंबर २०२२ मध्ये गोळीबार केला होता. यात तो बचावला होता. या प्रकरणात इंदुलकर वगळता चौघांना गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती. त्यामुळे यावेळीही इंदुलकरनेच गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज होता. प्रत्यक्षात यातील आरोपी वेगळेच असल्याचे सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्पष्ट झाले.
दरम्यान, धनराज हा ठाण्यातील इंदिरानगर नाका येथे येणार असल्याची माहिती युनिट पाचचे सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) भूषण शिंदे यांना मिळाली.
अर्धनग्न करीत केली होती मारहाण
कोकाटे याने सन २०१४ मध्ये धनराजविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. हा खोटा गुन्हा असल्याचा धनराजचा दावा होता.
गणेश याच्यासह १० ते १५ जणांनी इंदिरानगर भागात धनराजला अर्धनग्न करीत जबर मारहाण केली होती. याच अपमानाची सल धनराजच्या मनात होती.
या रागातून त्याने गणेशचा खून केल्याची कबुली दिली. तोडणकर याच्याविरुद्ध श्रीनगर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असून त्याला एका गुन्ह्यात न्यायालयाने फरार घोषित केले आहे, असे पाटील यांनी सांगितले.