महसूलची रेती माफियांवर कारवाई; बार्ज जाळले, ३६ लाखांचा मुद्देमाल केला नष्ट
By नितीन पंडित | Published: October 15, 2022 03:35 PM2022-10-15T15:35:09+5:302022-10-15T15:39:50+5:30
या कारवाईत खाडीत चार सक्शन बोटी अनधिकृत रेती उपसा करीत असताना आढळून आल्या
नितीन पंडित
भिवंडी : ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने रेतीमाफियांवर कारवाई करण्यास पुन्हा एकदा सुरवात झाली आहे.भिवंडी उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे व तहसीलदार अधिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी अतुल नाईक व तलाठी यांनी काल्हेर ते कोनगाव व मुंब्रा खाडी पात्रात जिल्हाधिकारी कार्यालयातील भरारी पथकासह शुक्रवारी धडक कारवाई केली आहे.
या कारवाईत खाडीत चार सक्शन बोटी अनधिकृत रेती उपसा करीत असताना आढळून आल्या. परंतु पथकाची चाहूल लागताच बोटी वरील कामगारांनी खाडीत उड्या मारून पळ काढला. त्यानंतर या पथकाने रेती भरलेले बार्ज पेटवून नष्ट केले, तर सक्शन बोटीचे खालील बाजूकडील वॉल उघडे करून ४ सक्शन बोटी बुडवून नष्ट केल्या आहेत.प्रत्येकी ८ लाख रुपये किमतीचे बार्ज व प्रत्येकी ५ लाख रुपये किमतीचे सक्शन असा एकूण ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत महसूल पथकाने नष्ट केला आहे .