CBSE टॉपर मुलीवरील सामूहिक बलात्कारात लष्कराचा जवान मुख्य आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 06:00 PM2018-09-15T18:00:57+5:302018-09-15T18:05:45+5:30

सीबीएसई परीक्षेत अव्वल आलेली विद्यार्थिनी १२ सप्टेंबरच्या दुपारी कनिना गावात शिकवणीला जाण्यासाठी बसथांब्यावर उभी असताना तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तिचं कारमधून अपहरण केलं आणि १२ जणांनी तिच्यावर बलात्कार केला.

rewari gang rape case one accused is army personnel | CBSE टॉपर मुलीवरील सामूहिक बलात्कारात लष्कराचा जवान मुख्य आरोपी

CBSE टॉपर मुलीवरील सामूहिक बलात्कारात लष्कराचा जवान मुख्य आरोपी

googlenewsNext

नवी दिल्लीः सीबीएसई परीक्षेत टॉपर राहिलेल्या १९ वर्षीय तरुणीवर १२ जणांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस तपासाला वेग आला असून चौकशीतून एक खळबळजनक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी लष्काराचा जवान असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. त्याचं नाव पंकज असल्याचं समजतं. राजस्थानमध्ये पोस्टिंग असलेला हा शिपाई सुटीवर हरयाणात आला होता. 

रेवारीतील सामूहिक बलात्कार प्रकरणानं देश हादरला आहे. सीबीएसई परीक्षेत अव्वल आलेली विद्यार्थिनी १२ सप्टेंबरच्या दुपारी कनिना गावात शिकवणीला जाण्यासाठी बसथांब्यावर उभी असताना तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तिचं कारमधून अपहरण केलं. तिला शीतपेयामधून गुंगीचं औषध पाजलं आणि झझ्झरच्या सीमेनजीकच्या शेतात तिच्यावर १२ जणांनी बलात्कार केला.  

या प्रकरणाचा तपास हरयाणा पोलिसांचं विशेष तपास पथक करतंय. आम्ही गुन्हा नोंदवून घेतला असून तीन आरोपींची ओळखही पटली आहे. त्यांच्यापैकी एक जण लष्करात कार्यरत असून आम्ही त्याच्याविरोधात वॉरंट काढलं आहे, अशी माहिती हरयाणाचे पोलीस महासंचालक बी एस संधू यांनी दिली. दरम्यान, आरोपीबद्दल माहिती देणाऱ्यांना एक लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलंय. 


या प्रकरणातील सर्व आरोपी पीडितेच्या कनिना गावातीलच आहेत. अपहरण आणि बलात्कारानंतर त्यांनीच तिला पुन्हा बसथांब्यावर आणून सोडलं होतं. इतकंच नव्हे तर, तुमची मुलगी बसस्टॉपवर बेशुद्धावस्थेत पडली असल्याचं त्यांनी पीडितेच्या घरी जाऊनही सांगितलं होतं. अत्याचारानंतर मुलीला मोठा मानसिक धक्का बसला असून आरोपी उजळमाथ्याने फिरत असल्याबद्दल तिच्या आईने संताप व्यक्त केला आहे.   



या प्रकरणाची तक्रार सुरुवातीला महेंद्रगढ जिल्ह्यात नोंदवण्यात आली होती. परंतु, पोलिसांनी २४ तास कुठलीही कार्यवाही न केल्यानं आरोपींना फरार होता आलं, असंही काही जणांचं म्हणणं आहे. त्यादृष्टीनेही एसआयटी चौकशी करतेय. 

Web Title: rewari gang rape case one accused is army personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.