रियाने स्वतःसह तुरुंगात दुसऱ्या कैद्यांसाठी गिरवले योगाचे धडे, वकिलांनी दिली माहिती
By पूनम अपराज | Published: October 8, 2020 09:50 PM2020-10-08T21:50:16+5:302020-10-08T21:50:59+5:30
Sushant Singh Rajput Case : तुरुंगात टिकून राहण्यासाठी रियाने स्वतःसाठी योगाची मदत घेतली आणि तिने दुसऱ्या कैद्यांसाठीही योगाचे वर्ग घेतले असे रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी सांगितले.
सुशांत राजपूत मृत्यूप्रकरणातील ड्रग्ज अँगलप्रकरणात एनसीबीने अटक केलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर भायखळ्यातील तुरुंगात राहण्याची वेळ आली होती. ती तुरुंगात २८ दिवस काढल्यानंतर अखेर काल बुधवारी भायखळा तुरुंगामधून सुटका होऊन घरी आली. मुंबई उच्च न्यायालयाने रियाला सर्शन जामीन मंजूर केला. मात्र, तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीचा जामीन अर्ज फेटाळून लावला गेला. तुरुंगात टिकून राहण्यासाठी रियाने स्वतःसाठी योगाची मदत घेतली आणि तिने दुसऱ्या कैद्यांसाठीही योगाचे वर्ग घेतले असे रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी सांगितले. एनडीटीव्हीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
मीडियाने रियाचा खूप पाठपुरावा केला होता. तुरुंगात असताना रियाने स्वत:ला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला, असे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, बऱ्याच वर्षांनी मी माझ्या क्लाइंटला पाहण्यासाठी तुरुंगात गेलो होते. रिया कुठल्या स्थितीमध्ये आहे ते मला पाहायचे होते. मी तिला पाहिले, त्यावेळी ती हिम्मत हरलेली, डगमगलेली नव्हती. तुरुंगात ती स्वत:ची काळजी घेत होती. ती स्वत:साठी आणि इतर कैद्यांसाठी तुरुंगात योगाचे वर्ग घ्यायची. तुरुंगातल्या परिस्थितीशी तिने स्वतःला जुळवून घेतले होते. कोरोनामुळे तिला घरात बनवलेले जेवण मिळत नव्हते. सामान्य माणसाप्रमाणे ती इतर कैद्यांसोबत राहत होती. आलेल्या परिस्थितीशी तिने दोनहात केले आणि लढा दिला. तिच्यावर आरोप करणाऱ्या किंवा कोणाचाही सामना करण्यास ती आता सज्ज आहे” असे सतीश मानेशिंदे यांनी पुढे म्हटले.
काल मुंबई उच्च न्यायालयाने रियाची १ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे. रियाची सुटका करताना कोर्टाने सांगितलं आहे की, “ रियाला 10 दिवस 11ते 5 या वेळेत रियाला जवळील पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. तसेच NCB जेव्हा चौकशीसाठी बोलवले तेव्हा हजर रहावे लागले. आपला पासपोर्ट जमा करावा तसेच कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात प्रवास करु नये. मुंबईबाहेर जायचं असल्यास तपास अधिकाऱ्याला कळवावं.
दोनदा झाली होती न्यायालयीन कोठडी वाढ
कोर्टाने रियाच्या न्यायालयीन कोठडीत दोनदा वाढ केली होती, त्यानंतर आता रियाला जामीन मंजूर झाला आहे. कनिष्ठ न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रिया, शोविक आणि मिरांडा यांच्यासह 5 जणांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.