भररस्त्यात रिक्षाचालकाची तरूणीला मारहाण, रिक्षाचालक अद्याप फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 09:08 PM2019-08-05T21:08:01+5:302019-08-05T21:09:58+5:30
नालासोपारा - शहरात वाढत चाललेल्या अनधिकृत रिक्षांचा सुळसुळाट हा प्रश्न ऐरणीवर असताना काही रिक्षा चालकांची दादागिरीमुळे अनेक ठिकाणी लोकांना ...
नालासोपारा - शहरात वाढत चाललेल्या अनधिकृत रिक्षांचा सुळसुळाट हा प्रश्न ऐरणीवर असताना काही रिक्षा चालकांची दादागिरीमुळे अनेक ठिकाणी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही रिक्षाचालकांनी दादागिरी करत प्रवाशांना मारहाण केल्याचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत. असाच प्रकार शनिवारी सकाळी नालासोपारा पश्चिमेकडील परिसरात घडला असून 25 वर्षीय तरुणीला शिविगाळ करून रस्त्यावर पाडून लाथाबुक्यांनी मारहाण करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जखमी तरुणीच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार रिक्षाचा आणि रिक्षाचालकाचा पोलीस शोध घेत आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील समेळ पाडा परिसरात राहणारी 25 वर्षीय तरुणी शनिवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घरी जाण्यासाठी ओव्हरब्रिजच्या खाली रिक्षा स्टँडवर येऊन रिक्षात बसली. बसलेल्या रिक्षात तरुणी बसल्यावर जोरात आवाजाने टेप लावण्यात आल्यावर तरुणीने आवाज कमी करण्यास सांगितले पण रिक्षा चालकाने त्या एकट्या तरुणीसोबत हुज्जत घालून टेपचा आवाज अजून वाढवला. सदर तरुणीला शिविगाळ केल्यावर जाब विचारल्यावर रागामध्ये रिक्षाचालकाने मारहाण करण्यास सुरुवात करून नंतर तिला रस्त्यावर आडवे पाडून लाथाबुक्यांनी मारहाण केल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. जखमी झालेल्या तरुणीने रिक्षाचा नंबर घेऊन नालासोपारा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकीकत सांगितल्यानंतर आरोपी रिक्षाचालकाविरोधात वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला असून फरार चालकाचा आणि रिक्षाचा पोलीस शोध घेत आहे.
ओव्हरब्रिजखालील पोलीस चौकी पाडली.....
पश्चिमेकडील ओव्हरब्रिजच्या खाली असलेल्या रिक्षा स्टँडच्या ठिकाणी सकाळी संध्याकाळी होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांनी लहान पोलीस चौकी उभी केली होती पण शनिवारी सकाळच्या सुमारास अनोळखी रिक्षाचालकाने धक्का मारून पोलीस चौकी पाडली असून ती पडल्याने काचा फुटलेल्या आहेत. सदर रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
25 वर्षीय तरुणीला रिक्षाचालकने मारल्याची तक्रार आल्यावर गुन्हा दाखल केला असून फरार चालकाचा आणि रिक्षाचा शोध घेत आहे. रिक्षाचालकावर मारहाण, शिविगाळ आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. - वसंत लब्दे (पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे)
रिक्षामध्ये कर्णकर्कश आवाजात टेप लावल्याने त्याला आवाज कमी करण्यास सांगितल्यावर त्याने आवाज वाढवल्यावर हुज्जत घालून लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली आहे. - पीडित तरुणी