सिग्नल तोडल्याने अडवल्यामुळे रिक्षाचालकाची पोलिसांना मारहाण ; दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 12:14 PM2021-01-11T12:14:36+5:302021-01-11T12:15:18+5:30
आरोपीने सिग्नल बंद असताना सिग्नल तोडून रिक्षा भरधाव वेगात पुढे नेली...
पिंपरी : सिग्नल तोडल्याने रिक्षाचालकाला पोलिसांनी अडवले. त्यावेळी हुज्जत घालून रिक्षा चालकाने पोलिसांना मारहाण केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करून पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली. देहूफाटा, मोशी येथे शनिवारी (दि. ९) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
अक्षय बलभीम जाधव (वय ३०, रा. महादेवनगर, चिखली), असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याच्यासह धीरेंद्र प्रताप सिंग (रा. देहूगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय ठिगळे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे भोसरी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. फिर्यादी ठिगळे त्यांच्या स्टाफसह देहूफाटा चौकात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी आरोपी अक्षय याने सिग्नल बंद असताना सिग्नल तोडून रिक्षा भरधाव वेगात पुढे नेली. त्यामुळे ट्राफिक वॉर्डनने रिक्षा अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी अक्षय याने ट्राफिक वॉर्डनसोबत हुज्जत घालून शिवीगाळ करून पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्यानंतर फिर्यादी ठिगळे यांना मारहाण केली. दारूची बाटली फोडून आरोपी अक्षय याने स्वतःला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याला अडवत असताना फिर्यादी जखमी झाले. पोलिसांसोबत झटापट करून त्यांच्याशी वाद घालून मारहाण करून आरोपीने सरकारी कामात अडथळा निर्माण केला.