महिला पोलिसांशी रिक्षाचालकाने केली गैरवर्तणूक; बोगस पत्रकार असल्याचा देखील दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 10:08 PM2018-07-16T22:08:31+5:302018-07-16T22:09:05+5:30
आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई - कर्तव्य बजावत असताना महिला पोलीस कर्मचारी असलेल्या मिराज शब्बीर सदे (वय - ३४) यांच्याशी सिग्नल तोडल्याने रिक्षाचालक मोहम्मद कलीम अब्दुल हालिम (वय - ३८) हा हुज्जत घालत गैरपणे वागला. याप्रकरणी आंबोली पोलीस ठाण्याने हालिमला अटक केली आहे.
डी. एन. नगर वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या मिराज या महिला पोलीस कर्मचारी शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास बाळासाहेब देवरस मार्ग येथील लोखंडवाला सर्कल येथे आपलं कर्तव्य बजावत होत्या. त्यावेळी सिग्नल तोडल्याने मिराज यांनी रिक्षाचालक हालिमची रिक्षा थांबवून परवाना दाखविण्यास सांगितलं. दरम्यान परवान्याची मुदत संपली असल्याने हालिम तो दाखविण्यास टाळाटाळ करत होता. नंतर हालिमने परवाना मिराज यांच्या हातातून काढून घेऊन फेकून दिला. तसेच एका वृत्तपत्राचे ओळखपत्र दाखवून मिराज यांच्याशी मी एका वृत्तपत्राचा पत्रकार असल्याचे सांगत तुझी बदनामी करेन अशी हुज्जत घालू लागला. शेवटी मिराज यांनी पोलीस नियंत्रण कक्षास कॉल केला. त्यानंतर आंबोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी हालिमला ताब्यात घेऊन अटक केली.