पुण्यात रिक्षाचालकाकडून तरुणीचा विनयभंग, धावत्या रिक्षातून उडी मारत केला बचाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 07:15 PM2019-02-04T19:15:38+5:302019-02-04T19:17:28+5:30
सहा आसनी रिक्षातील हिंगणे भागात एक महिला आणि पुरुष प्रवासी रिक्षातून उतरले. त्यानंतर रिक्षात तरुणी एकटीच होती..
पुणे : सहा आसनी रिक्षा चालकाने प्रवासी तरुणीचे अपहरण करुन तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावर घडला. या प्रसंगातून स्वत:चा बचाव करण्यासाठी तरुणीने रिक्षातून उडी मारली. यात तिला किरकोळ स्वरुपाची दुखापत झाली.याप्रकरणी धायरी येथील २३ वर्षाच्या तरुणीने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रिक्षा चालकालाचा पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गेल्या रविवारी रात्री स्वारगेट ते नºहे दरम्यान ही घटना घडली़ तक्रारदार तरुणी नृत्य प्रशिक्षण घेत आहे. पुणे स्टेशन भागात वर्ग आहे. ही तरुणी स्वारगेट परिसरातून सहा आसनी रिक्षातून धायरीला जात होती. सहा आसनी रिक्षातील हिंगणे भागात एक महिला आणि पुरुष प्रवासी रिक्षातून उतरले. त्यानंतर रिक्षात तरुणी एकटीच होती. रिक्षा चालकाने सिंहगड रस्त्याने धायरीच्या दिशेने नेण्याऐवजी कालव्याच्या रस्त्याने रिक्षा नेली. कालव्याच्या रस्त्याने रिक्षा चालक पुन्हा सिंहगड रस्ता भागात आला आणि मुंबई-बंगळुरु बाहयवळण मार्गाच्या दिशेने रिक्षा नेली. त्यामुळे तरुणीला संशय आला. तेव्हा त्याने नऱ्हे भागात काम आहे, दहा मिनिटात धायरीला सोडतो, असे सांगितले़ त्यामुळे या तरुणीने रिक्षाचालकाला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला़ तेव्हा रिक्षाचालकाने तिच्या चेहऱ्यावर गुंडाळलेला रुमाल ओढण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून तिने रिक्षातून उडी मारली. त्यानंतर तिने तिच्या मित्राशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. या घटनेत किरकोळ जखमी झालेल्या तरुणीने खासगी रुग्णालयात उपचार घेतले. तरुणीने पोलिसांकडे सहा आसनी रिक्षा चालकाचे वर्णन दिले. रिक्षाचालकाचा शोध सुरू आहे.