सध्या मी क्वारंटाईनमध्ये आहे, बाकी नंतर पाहू! मौलाना साद यांचे क्राईम ब्रँचला उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 07:33 PM2020-04-04T19:33:53+5:302020-04-04T19:37:19+5:30
नवी दिल्ली - दिल्लीच्या निझामुद्दीनस्थित तबलिगी जमातचे मौलाना मोहम्मद साद यांना क्राईम ब्रँचने नोटीस बजावली होती. क्राईम ब्रँचचे पथकाने मरकजसंबंधी ...
नवी दिल्ली - दिल्लीच्या निझामुद्दीनस्थित तबलिगी जमातचे मौलाना मोहम्मद साद यांना क्राईम ब्रँचने नोटीस बजावली होती. क्राईम ब्रँचचे पथकाने मरकजसंबंधी 26 प्रश्नांची उत्तरे मागितली होती. दरम्यान, मौलाना साद यांच्या शोधासाठी पोलीस अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. एका दिवसापूर्वी मौलाना साद यांनी आपला एक ऑडिओ क्लिप जारी केली होती. त्यात त्यांनी आपण आयसोलेशनमध्ये असल्याचे सांगितले आहे. क्राईम ब्रँचच्या नोटिसीला उत्तर देत मौलाना साद म्हणाले आहेत की, मी स्वत: क्वारंटाईनमध्ये आहे. सध्या मरकज बंद आहे, जेव्हा मरकज उघडेल तेव्हा बाकी प्रश्नांची उत्तरे देईन.
क्राईम ब्रँचकडून पाठवलेल्या नोटिसद्वारे संस्थेचा पूर्ण पत्ता, नोंदणीसंबंधी सविस्तर माहिती, संस्थेतील कर्मचाऱ्यांची संपूर्ण महिती ज्यात त्यांचा घरचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक आहे, मरकजच्या व्यवस्थापनाशी जोडलेल्या लोकांची सविस्तर माहिती मागविण्यात आली होती. त्याचबरोबर ही सर्व सामील लोकं कधीपासून मरकजशी जोडलेले आहेत.
तसेच मरकजची मागील 3 वर्षांच्या आयकराची माहिती, पॅन कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि एका वर्षाची बँक स्टेटमेंटची माहिती मागवली आहे. 1 जानेवारी 2019 पासून आतापर्यंत मरकजशी संबंधीत सर्व धार्मिक कार्यक्रमाची माहिती देखील मागितली आहे. विचारण्यात आले आहे की, मरकजमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहे का आणि जर लावले आहेत तर ते कुठे कुठे लावण्यात आले आहेत.
दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या पथकाने मौलाना साद यांना पोलीस किंवा प्रशासनाकडून धार्मिक कार्यक्रमासाठी लोकांचा जमाव जमवण्यासाठी कधी परवानगी घेतली होती का, परवानगी मिळाल्याबाबत असलेली कागदपत्रे, 12 मार्चनंतर मरकजला आलेल्या सर्व लोकांची संपूर्ण माहिती द्या, ज्यात परदेशी आणि भारतीयांचा समावेश आहे, असे प्रश्न विचारले आहेत. मरकजमध्ये लोकांची गर्दी जमा केल्याप्रकरणी मौलाना सादसह ६ जणांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, मौलाना साद अद्याप फरार आहेत.