बिहार पोलीस मुंबईत काय आले, रिया चक्रवर्तीची धावाधाव सुरु झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 07:06 AM2020-07-30T07:06:24+5:302020-07-30T07:06:43+5:30
मुंबईत दाखल पाटणा पोलिसांनी तिच्या खात्याचा लेखाजोखा काढण्यास सुरुवात केली आहे. बिहारमधील पाटणा पोलिसांच्या तपास पथकाने मुंबई पोलिसांकड़ून सुशांतसंबंधी आतापर्यंतच्या तपासाची माहिती घेतली.
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी रिया चक्रवर्तीविरुद्ध गुन्हा नोंद होताच, रियाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. याचा तपास मुंबईतच व्हावा अशी तिची मागणी आहे.
मुंबईत दाखल पाटणा पोलिसांनी तिच्या खात्याचा लेखाजोखा काढण्यास सुरुवात केली आहे. बिहारमधील पाटणा पोलिसांच्या तपास पथकाने मुंबई पोलिसांकड़ून सुशांतसंबंधी आतापर्यंतच्या तपासाची माहिती घेतली. तसेच बुधवारी रियाच्या घरीही पथक पोहचले. मात्र रिया घरी नव्हती. पाटणाच्या
राजीव नगर पोलीस ठाण्यात शनिवारी रियासह तिचे कुटुंब आणि सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी अशा एकूण ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केल्यानंतर मुंबई पोलिसांनीही सुशांतच्या आर्थिक व्यवहाराकडे मोर्चा वळवला आहे. मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी आतापर्यंत ३७ हून अधिक जणांचे जबाब नोंदवले आहेत.
पाटणा पोलिसांनी अद्याप रियाविरुद्ध वॉरन्ट जारी केलेले नाही. सुरूवातीला तिची चौकशी होईल, असे समजते. तर तपास मुंबईतच व्हावा, यासाठी रियाने वकील सतिश मानेशिंदे यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
अंकिता लोखंडेचीही होणार चौकशी
आत्महत्या करण्यापूर्वी काही महिने सुशांत अंकिता लोखंडेच्या संपर्कात आला होता. ते दोघे बरीच वर्षे एकत्र राहिले होते. त्यामुळे रियाकड़ून देण्यात आलेल्या धमकीबाबत सुशांतने अंकिताला काही सांगितले होते का? याबाबत तिच्याकडे चौकशी करण्यात येईल, असे पाटणा पोलिसांनी सांगितले.
अभिनेता सुशांतसिह राजपूत आत्महत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा प्रश्न नाही. मुंबई पोलीस सक्षम आहेत.
- अनिल देशमुख, गृहमंत्री