जालन्यात ठिकठिकाणी रोमिओंचा कट्टा; थट्टा करून मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 07:17 PM2018-08-25T19:17:45+5:302018-08-25T19:18:53+5:30
प्रत्येक ठिकाणी रोडरोमिओंनी कट्टा तयार केला आहे. याच कट्टयावर बसून मुलींची ‘थट्टा’ केली जात आहे.
- सोमनाथ खताळ/चैताली पालकर
जालना : सकाळी घरातून बाहेर पडल्यापासून ते सायंकाळी घरात येईपर्यंत आपण सुरक्षित असू का? याबाबत मुली, महिलांच्या मनात भिती आहे. प्रत्येक ठिकाणी रोडरोमिओंनी कट्टा तयार केला आहे. याच कट्टयावर बसून मुलींची ‘थट्टा’ केली जात आहे. याकडे मात्र छेडछाडविरोधी पथकाचेही दुर्लक्ष होत आहे. तर प्रतिष्ठा आणि बदनामीपोटी मुलीही हा त्रास निमुटपणे सहन करीत असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टींग आॅपरेशन’मधून समोर आला आहे.
शहरातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये, शिकवण्यांच्या परिसरात उभा राहून पाहणी केली असता सर्रासपणे छेडछाड होत असल्याचे दिसून आले. याला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत एक दामिनी पथक नियूक्त करावे, तसेच त्यांना कारवाईचे सक्त आदेश देण्याची मागणी आहे.
जालना शहरात शाळा, महाविद्यालये आणि शिकवण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सकाळी सहा वाजल्यापासूनच मुली शिक्षणासाठी घराबाहेर पडतात. काही मुलींना पालक सोडतात, तर काही एकट्या जातात. मुलीसोबत कोणी नसल्याची संधी साधून काही रोडरोमिओंनी त्यांना पाहून ‘टॉन्ट’ मारतात. हातवारे इशारे करतात. एकमेकांसोबत बोलून हसतात, एवढेच नव्हे तर रस्त्यावर दुचाकी आडवी लावून वाईट नजरेने मुलींना पाहतात. ही सर्व परिस्थिती पाहून अनेक मुलींचा पारा चढतो, परंतु रोजचेच असल्याने आणि कशाला नादी लागायचे, असे म्हणून त्या पुढे जातात. जालना शहरात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे असे प्रकार पहावयास मिळाले.
जालना बसस्थानकात प्रवेशद्वारावच दिसला घोळका
जालना शहरात शिक्षणासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात असते. हाच धागा पकडून आम्ही सर्वात आगोदर जालना बसस्थानक गाठले. येथे मुख्य प्रवेशद्वारावरच टवाळखोर मुलांचा घोळका उभा होता. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडे पाहून ते टाँट मारत होते. पुढे गेलो असता शाळकरी मुली बसच्या प्रतिक्षेत दिसून आल्या. बसला उशिर झाल्याने काही मुले त्यांच्याकडे पाहून हसताना दिसून आले. तसेच बसमध्ये चढतानाही धक्काबुक्कीचा प्रकार दिसून आला. येथे मात्र सुरक्षा रक्षक किंवा पोलीस नव्हते. त्यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे दिसले. तसेच बसमध्येही बसल्यावरही एकट्या मुलीला पाहून मुले मुद्दाम शेजारी बसत असल्याचेही एका मुलीने सांगितले.
रेल्वे स्थानक
रेल्वे स्थानकात दुपारच्यावेळी फारशी गर्दी नव्हती. रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी येथे रांग होती. परंतु स्थानकात कोठेही छेडछाड होत असल्याचे दिसले नाही. बाहेर पार्किंगमध्ये मात्र काही मुले येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पाहत होते.
नुतन वसाहत परिसर
नुतन वसाहत भागात पाहणी केली असता. येथे काही मुले रस्त्यावरच दुचाकी उभा करतात. रात्रीच्यावेळी हीच मुले मुलींचा पाठलाग करीत असल्याचे येथील काही लोकांनी सांगितले.
टाऊन हॉल, परिसर
या भागात महाविद्यालय आहे. त्यामुळे येथे मुलींची ये-जा असते. या मुलींची छेड काढण्यासाठी काही मुले समोरच उभा असतात. शुक्रवारी काही मुलींशी संवाद साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. परंतु परिस्थितीवरून या भागात मुलींच्या मनात भिती असल्याचे जाणवले.
मोती बाग, परिसर
सायंकाळच्या सुमारास मोतीबाग परिसरात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. येथे यात्रेचे स्वरूप येते. मुली, महिलांची संख्याही लक्षणीय असते. बाहेर खाद्य पदार्थांचे स्टॉल आहेत. येथे गेल्यावर मुद्दाम पाठलाग करून काही मुले छेड काढतात. तसेच रस्त्यावरच वाहने उभा करतात. गर्दी पाहता याठिकाणी पोलीस कर्मचारी नियूक्त करणे गरजेचे आहे. याबबरोबरच उड्डाणपुलाचा परिसर, देहेडकरवाडी परिसर, औरंगाबाद रोड आदी भागात मुलींना छेडछाडीचा सामना करावा लागत आहे.
दामिनी पथकाने तत्पर व्हावे
छेडछाडीला आळा बसावा, यासाठी जिल्हा पोलीस दलाने दामिनी पथकाची स्थापना केली. सहा कर्मचारी आणि एक अधिकारी या पथकासाठी नियूक्त केले. परंतु या पथकाकडून अद्यापही अपेक्षेप्रमाणे कारवाया झाल्या नसल्याचे दिसते. एकीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात छेडछाड होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र हे पथक सुस्त झाल्याचे पहावयास मिळते. मागील आठ महिन्यात केवळ चार खटले भरले असून १६ मुलांना समज देऊन सोडण्यात आले. जिल्ह्यातील रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.