तळेघर येथे रोडरोमिओंचा उच्छाद, विद्यार्थिनी त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 12:25 AM2018-12-24T00:25:27+5:302018-12-24T00:25:52+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथे रोडरोमिओंचा सुळसुळाट झाला आहे. शाळा, महाविद्यालये, तसेच बसस्थानक परिसरात मुली आणि महिलांच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत.
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथे रोडरोमिओंचा सुळसुळाट झाला आहे. शाळा, महाविद्यालये, तसेच बसस्थानक परिसरात मुली आणि महिलांच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणारे तळेघर हे गाव सामाजिक राजकीय व व्यापार, उद्योगव्यवसाय बाजारपेठ त्यातच शैक्षणिकदृष्ट्या केंद्रबिंदूचे ठिकाण असल्याने भीमाशंकर आहुपे व पाटण खोऱ्यातील हे मुख्य बाजारपेठेचे ठिकाण आहे. या भागामध्ये राहणाºया आदिवासी मुला-मुलींना हक्काचे शिक्षण मिळावे, यासाठी गेले २५ ते ३० वर्षांपूर्वी आदिवासी शिक्षण संस्था जुन्नर या संस्थेच्यावतीने तळेघर येथे शिवशंकर महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील शाळा, महाविद्यालयांच्या आवारात रोडरोमिओंनी उच्छाद घातला आहे. महाविद्यालयात येणाºया विद्यार्थिनींना, तसेच रस्त्यावरून जाणाºया महिलांच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत.
या त्रासाला महिला कंटाळल्या असून या रोडरोमिओंवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तळेघर येथे असणारे हे शिवशंकर महाविद्यालय व चिंतामणराव मोरमारे कनिष्ठ महाविद्यालय गावापासून थोडेसे दूर म्हणजे जांभोरी रोडला असल्यामुळे हे बहाद्दर शाळा भरताना व सुटताना गावामध्ये असणारे हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये महाविद्यालयाकडे जाणाºया जांभोरी फाटा चौकामध्ये जांभोरी रोड महाविद्यालयीन परिसर जुने वसतिगृह परिसर गावामधील एसटी स्टँड या भागामध्ये बिनधास्तपणे फिरकत असतात.
काही तरुणांकडे दुचाकी चालविण्याचा परवाना नसतानाही चौबल सीट बसवून भरधाव वेगाने दुचाकी हाकत मुलींची छेड काढत असतात.
यामुळे या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तत्काळ पावले उचलून दामिनी पथक, तसेच निर्भया पथकाची स्थापना करावी.
त्याचप्रमाणे महाविद्यालय व गावामध्ये हनुमान मंदिर येथे तक्रार पेट्या बसवण्यात याव्यात. याबरोबरच रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालकांनी
केली आहे.