महिलांचे मंगळसूत्र आणि सोनसाखळी चोरणाऱ्या म्होरक्यास अटक
By धीरज परब | Published: December 24, 2022 07:02 PM2022-12-24T19:02:49+5:302022-12-24T19:04:46+5:30
आयुक्तालयाच्या हद्दीत रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी खेचून दुचाकी वरून पळून जाणारे गुन्हे दाखल आहेत.
मीरारोड - मीरा भाईंदर - वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात दुचाकी वरून येऊन चेन स्नॅचिंग करणाऱ्या गुन्ह्यातील म्होरक्यास गुन्हे शाखा कक्ष १ ने बेड्या ठोकल्या आहेत. त्याने साथीदारासह १० गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.
आयुक्तालयाच्या हद्दीत रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी खेचून दुचाकी वरून पळून जाणारे गुन्हे दाखल आहेत. वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा १ चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक निरीक्षक कैलास टोकले व पुष्पराज सुर्वे सह तांबे, वाडिले, शिंदे, गर्जे, थापा, सावंत, विसपुते, राजपूत, पाटील, यादव यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास चालवला होता.
पोलीस पथकाने तपास करत चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील म्होरक्या जाफर गुलाब ईराणी ऊर्फ मुंडा ह्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्या कडून २ लाख ५५ हजार रुपयांचे सोने व ८० हजर किमतीच्या गुन्ह्यात वापरलेल्या २ दुचाकी जप्त केल्या. ईराणी ह्याने इतर साथीदारासह काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत ३ गुन्हे तर नवघर, वालीव, माणिकपूर, कासारवडवली, कोनगांव, पुण्याचे कोंडवा व मुंबईच्या सायन पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी १ प्रमाणे एकूण १० गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.