मॉडेलिंगसाठी घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 08:15 PM2019-10-11T20:15:57+5:302019-10-11T20:17:54+5:30
थापा २००७ पासून शहरात घरफोडीचे गुन्हे करत असल्याचे पोलीस तपासत उघड झाले आहे.
मुंबई - मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबई परिसरात ५० हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या सराईत दरोडेखोराला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पोलिसांनीअटक केली आहे. राहुल रामसिंग थापा (४०) असं या नेपाळी दरोडेखोराचं नाव आहे. घरफोडी करून मिळवलेला पैसा तो मॉडेलिंगसाठी पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी वापरत होता.
हा थाप घरफोडी करण्याच्या तयारीत ऐरोली येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ३चे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यानी सापळा रचत राहुल थापाला अटक केली. मूळचा नेपाळचा रहिवाशी असलेला थापा २००७ पासून शहरात घरफोडीचे गुन्हे करत असल्याचे पोलीस तपासत उघड झाले आहे. पोलिसांनी त्याला घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली. त्यानंतर तो जामिनावर बाहेर पडला. थापाने पुन्हा चोऱ्या करण्यास सुरूवात केली.
पोलीस चौकशीत थोपाविरोधात पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० गुन्हे असल्याचे उघड झाले. त्याचप्रमाणे अटक झाल्यानंतर जामिनावरुन बाहेर आल्यावर त्याने नवी मुंबई आणि ठाणे परिसरात ३० गुन्हे केले असल्याचं समोर आलं आहे. त्याच्याकडून सोने-चांदीचे दागिने, घड्याळे, रोख रक्कम असा २५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.