वृद्धेच्या हत्येचा उलगडा : घराचा दरवाजा उघडताच लुटारूचा महिलेवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 06:19 AM2019-10-01T06:19:45+5:302019-10-01T06:19:58+5:30
दीड महिन्यापासून बंद असलेले घर पाहून घरफोडीचा डाव आखलेल्या आणि दरवाजा उघडताच समोर वृद्धेला पाहून बिथरलेल्या लुटारूने वृद्धेवर थेट हल्ला चढविला.
मुंबई : दीड महिन्यापासून बंद असलेले घर पाहून घरफोडीचा डाव आखलेल्या आणि दरवाजा उघडताच समोर वृद्धेला पाहून बिथरलेल्या लुटारूने वृद्धेवर थेट हल्ला चढविला. यात ६७ वर्षीय रुक्षमणी विसरीया यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी कृष्णगिरी निमगिरी (५५) याला अटक केली आहे. तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईत ६ ते ७ गुन्हे दाखल आहेत. धक्कादायक बाब म्हणजे घटनेच्या दिवशीच विसरीया या दीड महिन्यानंतर गुजरातच्या आश्रमातून घरी परतल्या होत्या.
मुलुंड आर. आर. टी. रोड येथील त्रिवेदी भुवनमध्ये तळमजल्यावर त्या एकट्याच राहायच्या. त्याच्या पहिल्या मजल्यावर त्यांचा मुलगा राहण्यास होता. पर्युषण काळात दीड महिन्यासाठी त्या गुजरातच्या पालीटाना येथील आश्रमात ज्येष्ठ सहकाऱ्यांसोबत गेल्या होत्या. ८ सप्टेंबर रोजी त्या घरी परतल्या. त्या घरात झोपलेल्या असतानाच रात्रीच्या सुमारास निमगिरी त्यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने गेला. मात्र, घरात विसरीयांना पाहून त्याने घाबरून जवळील स्क्रू ड्रायव्हरने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांच्या गळ्यावर वार करत तो चोरी न करताच पसार झाला.
या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला. पोलीस उपायुक्त अखिलेश सिंह, साहाय्यक पोलीस आयुक्त पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी सरदेसाई यांच्या पथकाने या प्रकरणी परिसरात शोध सुरू केला.
घरातून काहीच चोरीस गेले नव्हते. कुठलाही पुरावा हाती नसल्याने हत्येमागचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर, तपासाअंती यामागे निमगिरीचा हात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ठाण्यातून ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच हत्या केल्याचे उघड झाले. तो बºयाच दिवसांपासून घराची रेकी करत होता. विसरीया या गुजरातला असल्याने घर बंद होते. त्यामुळे घरात कोणीही नसल्याचे समजून त्याने दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न केला. तो आवाज ऐकून विसरीयांनी दरवाजा उघडला आणि समोर त्यांना पाहून अटकेच्या भीतीने घाबरून त्यांची हत्या केल्याची माहिती निमगिरीने पोलिसांना दिली. या प्रकरणी मुलुंड पोलीस अधिक तपास करत आहेत.
निमगिरी सराईत गुन्हेगार
निमगिरी हा सराईत गुन्हेगार आहे. तो ठाण्यात राहतो. त्याच्याविरुद्ध मुंबईतच चोरी, घरफोडीचे ६ ते ७ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध असे अनेक गुन्हे दाखल असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्यादृष्टीने पोलीस अधिक तपास करत आहेत.