लुटीच्या वाटणीवरून चोरट्यांची भांडणे; एकाचा गळा चिरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 04:50 PM2019-11-06T16:50:45+5:302019-11-06T16:53:36+5:30

पोलिसांनी दोन साथीदारांना अटक केली. 

Robbers disputes over looted money distribution; One's throat was sliced | लुटीच्या वाटणीवरून चोरट्यांची भांडणे; एकाचा गळा चिरला

लुटीच्या वाटणीवरून चोरट्यांची भांडणे; एकाचा गळा चिरला

googlenewsNext
ठळक मुद्देएक सराईत चोरटा गंभीर जखमी

औरंगाबाद : सूतगिरणी चौकातील गुरुकृपा फरसाण मार्ट रविवारी रात्री फोडून लांबविलेल्या ९ हजार ५०० रुपयांच्या वाटणीवरून साथीदार चोरट्यांनी दुसऱ्याचा चाकूने गळा चिरल्याची घटना समोर आली. चोरी झालेल्या दुकानापासून जवळच सूतगिरणीच्या मैदानावर आणि चोरी केल्यानंतर अवघ्या दोन तासांत ही घटना घडली. यात एक सराईत चोरटा गंभीर जखमी झाला असून, जवाहरनगर पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश जनार्दन येडे (२१, रा. इंदिरानगर), इम्रान बेग आमीर बेग (२५, रा. काबरानगर) या दोघांना खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यांचे अन्य दोन साथीदार पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले. राजेश व इम्रान या दोघांनी रेकॉर्डवरील आरोपी शेख माजीद गुलाब शेख (१८, रा. काबरानगर) याचा गळा चिरून खून करण्याचा प्रयत्न केला. शेख माजीदवर घरफोडीचे जवळपास १५ गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी सांगितले की, शेख माजीद, शेख अफरोज ऊर्फ राज (१९), शेख अली शेख सत्तार पठाण (१९) व अन्य दोघे अशा पाच जणांचा गुरुकृपा फरसाण मार्ट फोडण्यात सहभाग होता. दुकान फोडल्यानंतर ते वाटण्या करण्यासाठी जवळच्याच सूतगिरणीच्या मैदानात गेले. वाटणीवरून त्यांच्यात वाद झाला व साथीदारांनीच माजीदचा गळा चिरला. जखमी माजीदला अफरोज आणि अलीने घाटी रुग्णालयात नेले.

याप्रकरणी घाटीतील नोंदीवरून एमएलसी घेत जवाहरनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच घरफोडीचाही गुन्हा दाखल करण्यात आला. वरील प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांच्या समवेत पोलीस उपनिरीक्षक तायडे, हवालदार बोराडे करीत आहेत.

Web Title: Robbers disputes over looted money distribution; One's throat was sliced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.