पत्र्याचे गाेदाम फाेडले; २३ कट्टे साेयाबीन लंपास
By राजकुमार जोंधळे | Published: December 5, 2022 05:31 PM2022-12-05T17:31:54+5:302022-12-05T17:32:02+5:30
चाेरट्यांनी सीसीटीव्ही डीव्हीआरही पळविला
लातूर: जिल्ह्यातील हलगरा येथे असलेले पत्र्याचे गाेदाम अज्ञात चाेरट्यांनी फाेडून २३ कट्टे लंपास केल्याची घटना लातूर-बिदर महामार्गालगत ३ ते ४ डिसेंबरदरम्यान पहाटेच्या सुमारास घडली. चाेरट्यांनी गाेदाम परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचा डीव्हीआरही पळविला आहे. याबाबत औराद शहाजानी पाेलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी नीलेश विश्वासराव गायकवाड (वय ३२, रा. हलगरा, ता. निलंगा) यांनी लातूर-बीदर महामार्गालगत खांडसरी परिसरात साेयाबीन खरेदी केंद्र उभारले आहे. गेल्या वर्षभरापासून या केंद्रावर साेयाबीन उत्पादक शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी आणत आहेत. महिनाभरापासून या केंद्रावर खरेदी करण्यात आलेले साेयाबीन पत्र्याच्या गाेदामात ठेवले हाेते. दरम्यान, सुरक्षा म्हणून सीसीटीव्हीची यंत्रणाही कार्यान्वित केली हाेती. मात्र, शनिवारी पहाटेच्या सुमारास चाेरट्यांनी गाेदामाच्या पाठीमागील पत्रा उचकटून आत प्रवेश केला. गाेदामात ठेवलेले साेयाबीनचे २३ कट्टे चाेरून लंपास केले. त्याचबराेबर सीसीटीव्हीचा डीव्हीआर, हार्ड डिस्क, राउटर असे साहित्यही पळविले. चाेरट्यांनी एकूण ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
पाेलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. याबाबत औराद शहाजानी पाेलीस ठाण्यात रविवारी गुन्हा नाेंद केला आहे.