लातूरमध्ये सैन्यातील जवानाच्या घरावर दरोडा; १० तोळे सोने लंपास, दरोडेखोर पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 11:45 AM2021-06-29T11:45:02+5:302021-06-29T11:46:10+5:30
पोलिसांनी पहाटे जिल्ह्यात नाकाबंदी लावली. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी पथके तैनात केली आहेत.
चाकूर (जि. लातूर) : सैन्य दलातील जवानाच्या घरावर दरोडा घालून १० तोळे सोने, दोन मोबाईलसह अन्य ऐवज दरोडेखोरांनी लंपास केल्याची घटना चाकूर तालुक्यातील लातूररोड येथे मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी पहाटे जिल्ह्यात नाकाबंदी लावली. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी पथके तैनात केली आहेत.अहमदपूर नजिक पोलिसांनी कार मधील दरोडेखोरांचा पाठलाग केला.तेव्हा दरोडेखोरांनी कार सोडून अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. चाकूर तालुक्यातील महाळंगी येथील सौदागर राजाराम चरक हे सध्या लातूररोड येथे घर बांधून राहतात.चरक सैन्य दलामध्ये जवान म्हणून आसाम राज्यात सेवा बजावत आहेत. ५ जूनला एक महिन्याच्या रजेवर ते गावी आले आहेत. दरम्यान, ४ जूलैला परत आसामला जाणार आहेत. मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घरासमोर चोरटे आलेची चाहूल चरक कुटूंबियांना लागली. खिडकीतून बाहेर पाहिले असता हतात बॅटरी घेऊन असलेले लोक दिसून आले. त्यावर चरक यांच्या कंम्पांउड मधून दरोडेखोरांनी प्रवेश केला. घराच्या मुख्य दरवाजाला धक्के देऊन दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चरक कुटूंबियांना दोघांनी चाकूचा धाक दाखवून धमकाविले. तर अन्य दोघांनी घरातील एका कपाटातील सोन्याचे दागिने त्यात मिनी गंठण, लॉकेट, झुमके, सरपाळे असे दहा तोळ्याचे होते. दरोडेखोरांनी ते दागिने लंपास केले. जाताना चरक आणि त्यांच्या पत्नीचे मोबाईल दरोडेखोरांनी घेऊन गेले. घटना घडताच सौदागर चरक आणि शेजारी इरफान कोतवाल यांनी चाकूर पोलिसांत जाऊन घटनेची माहिती दिली. पोलिस उपविभागीय अधिकारी विद्यानंद काळे,पोलिस निरिक्षक सोपान सिरसाट,पोउपनि खंडू दर्शने,पोहेकॉ हणमंत आरदवाड,परमेश्वर राख,दत्तात्रय थोरमोठे,पिराजी पुट्टेवाड,तानाजी आरदवाड,सूर्यकांत कलमे आदींनी घटनास्थळी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दाखल झाले.
जिल्ह्यात पोलिसांनी नाकाबंदी लावली.पोलिसांचे पथके दरोडे खोरांच्या शोधात रवाणा झाली. लातूर येथून श्वानपथकास पाचारण करण्यात आले. सकाळी श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लातूर ते नांदेड हा राष्ट्रीय महामार्गापर्यंतचा माग दाखविला. दरम्यान, अहमदपूर येथे पोलिसांनी नाकाबंदी केली असता एका कारमधून दरोडेखोर जात असलेचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्या कारचा पाठलाग केला. आयटीआय भागात जाऊन चोरट्यांनी कार सोडून आंधाराचा फायदा घेत पसार झाले. कार (एम.एच.४४ बी १३४) असा आहे. ही कार २७ जून रोजी अंबाजोगाई येथून चोरीस गेली होती.असे पोलीस निरीक्षक सिरसाट यांनी सांगितले. तिच कार आता पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिस दरोडेखोरांच्या शोधात आहेत.