उल्हासनगरात मंदिरातील पुजाऱ्याच्या घरी दरोडा; १० लाख ४० हजाराचा ऐवज लंपास, पुजाऱ्यालाही मारहाण
By सदानंद नाईक | Published: August 30, 2022 08:57 PM2022-08-30T20:57:02+5:302022-08-30T20:58:10+5:30
उल्हासनगर श्रीराम चौकात स्वामी धामाराम दरबार (मंदिर) असून दरबाराचे गादीसर (पुजारी) साई जय जाग्याशी हे कुटुंबासह मंदिराच्या मागच्या बाजूला राहतात.
उल्हासनगर: कॅम्प नं-४ श्रीराम चौकातील मंदिराच्या पुजाऱ्याच्या घरी मंगळवारी सकाळी ५ वाजता हातात तलवारी घेऊन ७ जणांच्या टोळक्याने दरोडा टाकला. पुजाऱ्यासह त्याच्या मुलाला मारहाण करून व महिलांना धाक दाखवून ८० हजार रोख रक्कमेसह १० लाख ८० हजाराचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली आहे.
उल्हासनगर श्रीराम चौकात स्वामी धामाराम दरबार (मंदिर) असून दरबाराचे गादीसर (पुजारी) साई जय जाग्याशी हे कुटुंबासह मंदिराच्या मागच्या बाजूला राहतात. मंगळवारी पहाटे ५ वाजता इको कारमध्ये आलेले ७ दरोडेखोर मंदिराचा दरवाजा तोडून पुजारी साई जय जग्याशी यांच्या घरी गेले. त्यांच्या हातात तलवारी व चॉपर होते. त्यांनी जग्याशी यांना धमकावून घरात सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम शोधण्यास सुरू केली. यावेळी साई जय जग्याशी व मुलगा चिराग यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच तलवारी व चॉपरने मारण्याचा धाक दाखविला. यामध्ये साई जग्याशी व मुलगा चिराग जखमी झाले.
उल्हासनगरात मंदिरातील पुजाऱ्याच्या घरी दरोडा; १० लाख ४० हजाराचा ऐवज लंपास, पुजाऱ्यालाही मारहाण#robbery#Ulhasnagarpic.twitter.com/hGIbAYmQUA
— Lokmat (@lokmat) August 30, 2022
शहरातील मुख्य श्रीराम चौकात स्वामी धामाराम दरबार असून दरबार येथील रस्त्यावरून सकाळी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात जाणे-येणे असते. तर हाकेच्या अंतरावर सहायक पोलीस आयुक्त कार्यालय व विठ्ठलवाडी पोलीस ठाणे आहे. अशा वर्दळीच्या ठिकाणी पहाटे ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान दरोडा पडल्याने, नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. दरोडेखोरांनी ८० हजार रोख रक्कम व १० लाखाचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली. तसेच पोलीस दरोडेखोरांच्या मार्गावर असल्याचे ते म्हणाले. तर सहायक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दरोडेखोर लवकरच पोलिसांच्या ताब्यात असल्याचे संकेत दिले. तसेच पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे सांगितले. शिवसेना नेते व स्थानिक नगरसेवक धनंजय बोडारे यांनी शहरात गुन्हेगारी वाढली असून पोलिसांनीगुन्हेगारीवृत्तीच्या इसमावर सक्त कारवाई करण्याची मागणी यावेळी केली.