घर लुटण्यासाठी आलेल्या टोळक्यांचा कुटुंबातील चौघांवर गोळीबार; तिघांचा जागीच मृत्यू, आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 01:59 PM2021-06-28T13:59:23+5:302021-06-28T14:01:08+5:30
कपडा व्यापारी आणि त्याच्या दोन्ही मुलांचा गोळीबारात जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर आहे
गाजियाबाद – उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे रात्री उशीरा काही टोळक्यांनी एकाच कुटुंबातील ४ जणांवर गोळ्या झाडल्या. यातील तिघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. अज्ञात आरोपी लुटमारीच्या हेतूने एका कपडा व्यापाऱ्याच्या घरात घुसले होते. त्यावेळी घरात कपडा व्यापाऱ्यासोबत त्याची पत्नी, दोन मुलं आणि सून उपस्थित होती. आरोपींनी घरात घुसून लुटमारी करण्याचा प्रयत्न केला असता कुटुंबाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा या टोळक्यांनी व्यापारी, त्याची पत्नी, आणि दोन मुलांवर गोळीबार केला.
घटनास्थळीच झाला मृत्यू
कपडा व्यापारी आणि त्याच्या दोन्ही मुलांचा गोळीबारात जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर आहे. तर घरातील सून बेशुद्ध अवस्थेत सापडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कपडा व्यापारी आणि त्यांच्या दोन्ही मुलांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवण्यात आला आहे. व्यापाऱ्याच्या गंभीर स्थितीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे.
घटनास्थळी समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राशिद अली पोहचले. त्यानंतर त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले. ६५ वर्षीय रईसुद्दीन जे कपड्याचा व्यवसाय करत होते ते अली यांचे नातेवाईक होते. रईसुद्दीन, त्यांची पत्नी फातिमा, मुलगा अजरुद्दीन आणि इमरान, सून यांच्यासोबत या परिसरात राहत होते. रात्री उशीरा लुटमारीच्या हेतून काही लोक त्यांच्या घरात घुसले. तेव्हा रईसुद्दीन यांच्या कुटुंबाने त्यांना विरोध केला असता त्यांनी कुटुंबावर गोळ्या झाडल्या. या रईसुद्दीन, अजरुद्दीन आणि इमरानचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत पत्नी फातिमा गंभीर जखमी झाली तर सून बेशुद्ध अवस्थेत आढळली.
या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. पहाटे ३ च्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर तात्काळ एसपी अमित पाठक घटनास्थळी पोहचले. पोलीस पोहचण्यापूर्वीच रईसुद्दीन, अजरुद्दीन आणि इमरानचा मृत्यू झाला होता. जखमी अवस्थेत असलेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल केले. पोलीस सध्या सर्व अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत. लवकरच दोषींना पकडलं जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.