दरोडा, जबरी चोरी करणारे तिघे सातारा जिल्ह्यातून हद्दपार, उंब्रजमध्ये गुन्हे; सुधारण्याची संधी देऊनही फरक नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 10:51 PM2023-04-19T22:51:57+5:302023-04-19T22:52:26+5:30
टोळीचा प्रमुख शाहीद उर्फ सोन्या शब्बीर मुल्ला (वय २८), शाहरुख शब्बीर मुल्ला (वय २९, दोघेही रा. कोणेगाव, ता. कऱ्हाड, जि. सातारा), अमित अंकुश यादव (वय ३६, रा. कवठे, ता. कऱ्हाड, जि. सातारा) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सातारा : कऱ्हाड तालुक्यातील उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहनांची जाळपोळ करणाऱ्या तीन सराईतांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केली.
टोळीचा प्रमुख शाहीद उर्फ सोन्या शब्बीर मुल्ला (वय २८), शाहरुख शब्बीर मुल्ला (वय २९, दोघेही रा. कोणेगाव, ता. कऱ्हाड, जि. सातारा), अमित अंकुश यादव (वय ३६, रा. कवठे, ता. कऱ्हाड, जि. सातारा) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या टोळीवर पोलिसांनी अनेकदा कारवाई केली होती. त्यांना कायद्याचा धाक नसून ते बेकायदा कारवाया करत होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे फार मोठे आर्थिक व शारीरिक नुकसान झाले होते. त्यांना अनेकदा सुधारण्याची संधी देण्यात आली. परंतु त्यांच्यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही.
उंब्रज पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी या तिघांवर हद्दपारीची कारवाई व्हावी, यासाठी प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी तातडीने मंजुरी देऊन तिघांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलिस नाईक प्रमोद सावंत, पोलिस काॅन्स्टेबल केतन शिंदे, महिला पोलिस अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला. त्यामुळे वरील तिघांवर हद्दपारीची कारवाई झाली.
वर्षभरात १९ जण हद्दपार...
नोव्हेंबर २०२२ पासून आतापर्यंत सात उपद्रवी टोळ्यांमधील १९ जणांना सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांच्याविरुद्ध हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत.