मिरज-पंढरपूर महामार्गावर लुटणाऱ्या टोळीचा छडा, एकाला अटक

By शीतल पाटील | Published: January 16, 2023 08:45 PM2023-01-16T20:45:10+5:302023-01-16T20:45:31+5:30

एकाला अटक : मोटार अडवून कोल्हापूरच्या तिघांना लुटले

Robbery gang busted on Miraj-Pandharpur highway, one arrested | मिरज-पंढरपूर महामार्गावर लुटणाऱ्या टोळीचा छडा, एकाला अटक

मिरज-पंढरपूर महामार्गावर लुटणाऱ्या टोळीचा छडा, एकाला अटक

Next

सांगली : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कुची गावानजीक ३० डिसेंबर रोजी मोटारीतील महिलांसह प्रवाशाला चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम व दागिन्यासह सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. या दरोड्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. याप्रकरणी जलवा उर्प त्रिदेव सिसफुल भोसले (वय ४२, रा. लिंगनूर, ता. मिरज) याला अटक केली आहे. त्याचे चार साथीदार फरार झाले असू त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याचे पोलिस अधिक्षक डाॅ. बसवराज तेली यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

याबाबत माहिती अशी की, कोल्हापूर येथील माधवी जनार्दन जानकर (वय २५, रा. घाडगे कॉलनी, कोल्हापूर), विकास परशुराम हेगडे (वय २२, रा. जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी, कोल्हापूर) व भाग्यश्री विलास पाटील (वय २८ रा. सरनोबतवाडी, जि. कोल्हापूर) हे शुक्रवार ३० डिसेंबर रोजी पहाटे कोल्हापूरहून पंढरपूरकडे मोटारीतून निघाले होते. भाग्यश्री पाटील या मोटार चालवत होत्या. कुची हद्दीत रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय मार्गावर पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास एका धाब्यानजीक त्यांच्या मोटारीवर दगड मारला. यामुळे भाग्यश्री पाटील यांनी मोटार रस्त्याकडेला उभा केली. काही कळण्याच्या आतच पाच चोरटे तेथे आले. यातील दोघांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्या जवळ असलेले सोन्या-चांदिचे दागिने व रोख रकमेसह मोबाईल असा एक लाख ९१ हजार ५०० रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला. यावेळी माधव व विकास यांची चोरट्यांसोबत झटापटही झाली. यात ते दोघे जखमी झाले.

या दरोड्याचा तपास एलसीबीकडे होता. एलसीबीच्या पथकाला जलवा भोसले व त्याच्या साथीदारांनी दरोडा टाकल्याची माहिती मिळाली. पथकाने लिंगनूर येथे छापा टाकून जलवा याला ताब्यात घेतले. त्याचे इतर चार फरार झाले आहेत. जलवाकडून पोलिसांनी चोरीतील मोबाईल हस्तगत केला आहे.

संशयित सराईत गुन्हेगार

दरोड्यातील पाचही संशयित सराईत गुन्हेगार आहेत. जलवा याच्याविरूद्ध तासगाव व रांजणगाव (जि. पुणे) पोलिस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत. तर त्याच्या साथीदावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Robbery gang busted on Miraj-Pandharpur highway, one arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.