दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार असलेला टोळी प्रमुख जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 04:59 PM2019-09-20T16:59:08+5:302019-09-20T16:59:43+5:30

हाणामारी, चोरी व आर्म अ‍ॅक्ट असे एकुण सहा गुन्हे भोसरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत..

Robbery gang chief arrested | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार असलेला टोळी प्रमुख जेरबंद

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार असलेला टोळी प्रमुख जेरबंद

googlenewsNext
ठळक मुद्देभोसरी : गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

पिंपरी : भोसरी येथील आठवडे बाजारात गोळीबार करून व्यावसायिकाची सोनसाखळी व गल्ल्यातील रोख रक्कम घेऊन फरार झालेल्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात यश आले आहे. हा गुन्हेगार एका टोळीचा प्रमुख आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बुधवारी (दि. १८) ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुदत्त उर्फ  बाबा अशोक पांडे (रा. भोसरी)असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास कामी त्याला भोसरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, भोसरी येथे आठवडे बाजाराच्या दिवशी अंकुशराव लांडगे सभागृहासमोर अक्षय अंगत भांडवलकर (रा. धवावडे वस्ती, भोसरी) हा मोबाईल स्पेअरपार्टस् विक्री करीत होता. त्यावेळी सनी उर्फ  सॅन्डी गुप्ता, बाबा पांडे, शिवा खरात, विकास जैसवाल व त्यांचा एक साथीदार असे चारचाकी वाहनातून तेथे आले. तुझ्या कडे जे काही असेल ते काढून दे, आम्ही इथले भाई आहोत,  असे म्हणाले. त्यावर अक्षय भांडवलकर याने पैसे देण्यास नकार दिला असता सॅन्डी गुप्ता याने त्याच्याकडील पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर अक्षय भांडवलकर यांच्या गळ्यातील सोनसाखळी व गल्ल्यातील रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन परिसरामध्ये दहशत निर्माण केली होती. भोसरी येथे ११ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला होता. याप्रकरणी दरोड्याबाबतचा भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिवाजी खरात व विकास शाम जैसवाल यांना यापूर्वी अटक केलेली असून त्यांच्या टोळीचा प्रमुख बाबा पांडे फरार होता. 
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाकडून भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फरारी आरोपीचा शोध घेण्यात येत होता. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार बाबा पांडे भोसरी स्मशानभुमी शेजारी येणार आहे, अशी माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा लावून आरोपी बाबा पांडे याला शिताफीने ताब्यात घेतले. 
आरोपी बाबा पांडे भोसरी पोलीस ठाण्याकडील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याची भोसरी भागात टोळी असून, तो टोळीचा प्रमुख आहे. त्याच्या टोळीचे व भोसरी भागात कार्यरत असलेल्या ज्ञानेश्वर लांडगे याच्या टोळीमध्ये वर्चस्वावरून वारंवार  भाडणे होत असत. त्याच कारणावरून सन २०१४ मध्ये आरोपी बाबा पाडे यांने त्याचे साथीदार प्रतिक तापकीर, सँडी गुप्ता यांच्या मदतीने ज्ञानेश्वर लांडगे याच्या टोळीतील अक्षय काटे याचा खून केला होता. त्याबाबत भोसरी पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे. तसेच त्याच्यावर हाणामारी, चोरी व आर्म अ‍ॅक्ट असे एकुण सहा गुन्हे भोसरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तसेच ज्ञानेश्वर लांडगे हा किशोर झेंडे याच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये सन २०१५ पासून तुरुंगात होता. तो नुकताच तुरुंगातून सुटला असून, त्याला मारण्यासाठी तसेच स्वत:च्या स्वरक्षणासाठी बाबा पांडे याला दोन पिस्तूल व चार काडतुसे बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलीस पथकाने दि. ५ जुलै २०१९ रोजी अटक केली होती.
सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल, अपर पोलीस आयुक्त रोमनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी गणेश पाटील, विजय मोरे, प्रवीण पाटील, मनोजकुमार कमले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Robbery gang chief arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.