Robbery in HDFC Bank: अवघ्या ४५ सेकंदांत एचडीएफसी बँक लुटली; महिला कॅशिअरची चेन, ३० लाख घेऊन गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 22:22 IST2022-02-19T22:22:02+5:302022-02-19T22:22:37+5:30
Robbery in HDFC Bank: दरोडेखोरांनी अवघ्या 45 सेकंदात हा गुन्हा केला. हे हल्लेखोर दोन दुचाकींवर आले होते. घटनेची माहिती मिळताच तरनतारनचे एसएसपी गुल नीत सिंह खुराना घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिसराची नाकाबंदी केली, मात्र दरोडेखोरांचा पत्ता लागला नाही.

Robbery in HDFC Bank: अवघ्या ४५ सेकंदांत एचडीएफसी बँक लुटली; महिला कॅशिअरची चेन, ३० लाख घेऊन गेले
जम्मू-काश्मीर, राजस्थान राष्ट्रीय मार्गावरील नौशहरा पन्नूआमध्ये एचडीएफसी बँकेमध्ये दरोडा टाकण्यात आला. यामध्ये अवघ्या ४५ सेकंदांत तीस लाखांची रक्कम लुटून नेण्यात आली. दरोडेखोरांनी सुरक्षा रक्षकाची डबल बॅरलची बंदूकही नेली आहे. याचबरोबर महिला कर्मचाऱ्याची सोन्याची चेन, मोबाईल फोनही हिसकावून नेला आहे. कोणताही पुरावा मिळू नये म्हणून बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरांचे डीव्हीआरदेखील घेऊन गेले.
या दरोड्यामुळे खळबळ उडाली आहे. ही दरोड्याची घटना पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील सरहली पोलीस स्टेशन अंतर्गत नौशहरा पन्नुआ शहरातील आहे. दुपारी २.१५ वाजता तीन चोरट्यांनी एचडीएफसी बँकेत प्रवेश केला. एकाने बँकेच्या गेटवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात पिस्तुलाचे बट मारले आणि 12 बोअरची परवाना असलेली बंदूक हिसकावून घेतली.
दुसरीकडे, दुसऱ्या दरोडेखोराने बँकेचे शाखा व्यवस्थापक आशिष अरोरा यांना लक्ष्य केले, तर तिसऱ्या दरोडेखोराने केबिनमध्ये जाऊन महिला कॅशियरकडे पिस्तूल दाखवून 30 लाखांची रक्कम लुटली. हे एवढ्या अचानक आणि वेगाने घडले की अनेकांना काय होतेय हे देखील समजले नाही.
तेथून निघताना चोरट्यांनी महिला कॅशियरच्या गळ्यातील सोनसाखळी, एक मोबाईल आणि बँक मॅनेजरचा मोबाईल हिसकावून नेला. या तिन्ही दरोडेखोरांनी बँकेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरही नेला. दरोडेखोरांनी अवघ्या 45 सेकंदात हा गुन्हा केला. हे हल्लेखोर दोन दुचाकींवर आले होते. घटनेची माहिती मिळताच तरनतारनचे एसएसपी गुल नीत सिंह खुराना घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिसराची नाकाबंदी केली, मात्र दरोडेखोरांचा पत्ता लागला नाही.