धक्कादायक! मुरी एक्स्प्रेसमध्ये दरोडा; प्रवाशांना मारहाण करून लाखो रुपयांचा ऐवज लुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 10:20 AM2023-09-24T10:20:40+5:302023-09-24T10:21:20+5:30
एका ट्रेनमध्ये मोठा दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी प्रवाशांचे पैसे आणि सामान लुटले आहे. यासोबतच त्यांना मारहाण करून जखमीही केले.
झारखंडमधील लातेहारमध्ये एका ट्रेनमध्ये मोठा दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी प्रवाशांचे पैसे आणि सामान लुटले आहे. यासोबतच त्यांना मारहाण करून जखमीही केले. हा दरोडा बरकाकाना रेल्वे विभागाच्या बरवाडीह-छिपाडोहर रेल्वे स्थानकादरम्यान घडला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
लातेहार आणि बरवाडीह स्थानकांदरम्यान मुरीहून जम्मूतवीकडे जाणाऱ्या मुरी एक्स्प्रेस ट्रेनमध्ये दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी प्रवाशांना बेदम मारहाण करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना रात्री उशिरा 12 ते 1 च्या दरम्यान घडली. सर्व दरोडेखोर लातेहार स्थानकावरून चढले होते.
दरोडेखोरांची संख्या 7 ते 8 असल्याचे सांगण्यात येत आहे. अकराच्या सुमारास ही गाडी लातेहारहून निघाली. त्यानंतर दरोडेखोरांनी लुटमार सुरू केली. S9 बोगीत बसलेल्या महिला प्रवाशांशीही गैरवर्तन करण्यात आले.
दरोडेखोरांनी 8 ते 10 राऊंड गोळीबारही केला. दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोर बारवडीह स्थानकासमोर साखळी खेचून खाली उतरले. ही गाडी डालतेनगंज स्थानकावर येताच प्रवाशांनी गोंधळ घातला. डालटेनगंज स्थानकावर दोन तासांहून अधिक वेळ गाडी थांबली होती.
विश्व हिंदू परिषदेचे लातेहार जिल्ह्याचे मंत्री विकास मित्तल यांचे 17 हजार रुपये लुटण्यात आले असून त्यांनाही दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली आहे. मित्तल कुटुंबासह वैष्णोदेवीला जात होते. सर्व जखमी प्रवाशांवर डालटेनगंज स्थानकात उपचार करण्यात आले. सध्या रेल्वे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.