सासू-सुनांच्या तोंडावर चिकटपट्टी लावली; चाकूनं धाक दाखवत भरदिवसा ७० तोळं सोनं लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 15:13 IST2022-03-07T15:08:12+5:302022-03-07T15:13:16+5:30
Dacoity Case : दरोडेखोरांनी घरातील महिलांच्या तोंडावर चिकटपट्टी लावून त्यांना चाकूचा धाक दाखवत अंगावरील दागिन्यांसह कपाटात ठेवलेले दागिने व दीड ते दोन लाखांची रोकड लूटुन पोबारा केला. या जबरी दरोड्याने सातपुरसह संपुर्ण शहर हादरले.

सासू-सुनांच्या तोंडावर चिकटपट्टी लावली; चाकूनं धाक दाखवत भरदिवसा ७० तोळं सोनं लुटले
नाशिक : त्र्यंबकरोडवरील सातपुर कॉलनीजवळ असलेल्या लाहोटीनगरमधील भगवान गड नावाच्या मोठ्या बंगल्यात सोमवारी (दि.७) सकाळी पाच दरोडेखोरांनी शिरकाव करत सुमारे ७० तोळे सोने लुटल्याची घटना घडली. दरोडेखोरांनी घरातील महिलांच्या तोंडावर चिकटपट्टी लावून त्यांना चाकूचा धाक दाखवत अंगावरील दागिन्यांसह कपाटात ठेवलेले दागिने व दीड ते दोन लाखांची रोकड लूटुन पोबारा केला. या जबरी दरोड्याने सातपुरसह संपुर्ण शहर हादरले.
नेहमीप्रमाणे सातपुर परिसर सकाळच्या वेळेस गजबजलेला असताना अचानकपणे लाहोटीनगरमधील एका बंगल्याबाहेर रहिवाशांची गर्दी जमली. यावेळी या बंगल्यात जबरी दरोडा पडल्याचे समोर आले. उद्योजक बाबासाहेब संतोष नागरगोजे यांचा भगनवान गड नावाचा मोठा बंगला आहे. या बंगल्यात सकाळी त्यांची वयोवृद्ध पत्नी शहाबाई नागरगोजे, सून मंगल रवींद्र नागरगोजे, आरती गणेश नागरगोजे या होत्या. घरात कोणीही पुरुष नसल्याची संधी साधत पाच दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत सर्वप्रथम शहाबाई यांच्या गळ्याला चाकू लावला. शहाबाईंचा आवाज ऐकून वरील खोल्यांमध्ये असलेल्या त्यांच्या दोन्ही सुना बैठक खोलीत आल्या असता दरोडेखोरांनी त्यांनाही चाकूचा धाक दाखविला. सासु-सुनांच्या तोंडावर चिकटपट्टी लावून त्यांना धाक दाखवून देवघराजवळ बंदी बनवून ठेवले. यावेळी वरच्या खोलीत कपाट उघडून चोरट्यांनी त्यामध्ये ठेवलेले सुमारे ६० ते ७० तोळे सोने व दोन लाखांची रोकड घेऊन पोबारा केला. चौघा दरोडेखोरांनी तोंड उघडे ठेवलेले होते, तर एकाने तोंडावर मास्क घातलेला होता, अशी माहिती प्रथमदर्शनी समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच सातपुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बंगल्यात कोठेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे दरोडेखोरांविषयीचा महत्वाचा पुरावा मिळू शकला नाही. याप्रकरणी उशीरापर्यंत पोलिसांकडून बंगल्यात पंचनामा केला जात होता.